केतकी येथे 50 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
अहमदनगर । प्रतिनिधी । 25 - मला राजकारणातून संपवण्यासाठी माझ्या मतदारसंघाचे तुकडे करण्यात आले. नगर तालुक्याचा 15 वर्षांत सर्वांगीण विकास केल्याने तालुक्यातील लोकांनी आपणास पुन्हा पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. राहुरी मतदारसंघातून दुसर्यांदा आमदार झालो. प्रभाग बदलून निवडून येणे शक्य नसताना आपण मतदारसंघ बदलला तरी निवडून आलो. विकासकांमामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. नगर तालुक्यातील केकती येथे आ. कर्डिले यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. कर्डिले बोलत होते. याप्रसंगी जि.प. सदस्य बापूसाहेब सदाफुले, बाजीराव गवारे, पं.स. उपसभापती शरद झोडगे, लॉरेन्स स्वामी, गटविकास अधिकारी होजगे, राम पानमळकर, अनिल करांडे, अंबादास बेरड, संजय धोत्रे, माणिक वाघस्कर, विलास महामुनी, अशोक खोमणे, विजय खोमणे, इटेवाड सर, अशोक जाधव, बाळासाहेब तागडकर, रावसाहेब वाघस्कर, जगदीश कुडिया, विजया बडे, धनाजी परतांडे, हरिश साबळे, रवी बनसोडे, विजय करांडे, सुतार उपस्थित होते.
आमदार कर्डिले पुढे म्हणाले की, आमदार निधी व्यतिरिक्त शासनाचा इतर निधी मतदारसंघासाठी आणला. त्यामुळे विकासकामे मार्गी लागू शकली. विविध योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. मतदारसंघातील नगर शहरालगतच्या गावांचा विकास झाल्याने या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. केकती गावात मागील वर्षी कोटभर रुपयांची कामे केली. आताही विकासकामे सुरू केली आहेत, असे ते म्हणाले.
सदाफुले म्हणाले की, आमदार कर्डिलेंमुळे बुर्हाणनगर पाणी योजना सुरू झाली. 44 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. दुष्काळी परिस्थितीचा त्यामुळेच आम्ही सामना करू शकलो. मिरी-तिसगाव पाणी योजना आ. कर्डिले यांनीच सुरू केली, असे ते म्हणाले. केकती गावात सुमारे 50 लाख रुपये खर्चून व्यायामशाळा, 2 समाज मंदिरे, काँक्रीटीकरण, स्मशानभूमी आदी कामे केली जाणार आहेत.