Breaking News

जिल्ह्यात 31 हजार व्यापार्‍यांना विक्रीकर विभागाच्या नोटिसा

सांगली ः दि. 21 - व्यवसाय कर भरुनही सांगली जिल्ह्यातील 31 हजार व्यापार्‍यांना विक्रीकर विभागाने थकबाकीची नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे हा प्रकार झाला आहे, पण ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न विक्रीकर विभाग करीत आहे. नोटिसांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना व्यापार्‍यांना दिल्या आहेत. यामुळे व्यापार्‍यांच्यात खळबळ उडाली आहे. त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव व हेलपाटे मारण्याचा नाहक मनस्ताप होत आहे. 
गेल्या काही वर्षांपासून कर भरणार्‍या सर्व व्यापार्‍यांची माहिती अपडेट करण्यासाठी विक्रीकर विभागामार्फत नवीन संगणक प्रणाली बसविली आहे. व्यवसाय कर भरल्याचे बँकेचे चलन व स्क्रोल विक्रीकर विभागाला दिले, की ती माहिती सिस्टीममध्ये भरण्याचे काम विक्रीकर विभागाच्या कर्मचार्‍यांचे आहे. पण या विभागात रामभरोसे कारभार सुरु आहे. 2008-09 ते आज अखेर सर्व व्यापार्‍यांनी कोट्यावधींचा व्यवसाय कर नियमित भरला आहे. तशी कागदपत्रे विक्रीकर विभागाला दिली आहेत. मात्र त्यांची नोंद संगणक प्रणालीत करण्यात आलेली नाही. काहींची नोंद झाली आहे, पण ती अपूर्ण आहे. एखाद्या वर्षांची नोंद झालेली नाही, ही बाब समजून येण्यासारखी आहे. पण गेल्या सहा-सात वर्षांची नोंद न करण्याचा अजब प्रकार सांगलीच्या विक्रीकर विभागात घडला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. भरलेल्या कराची नोंद झाल्याने सर्व व्यापार्‍यांची मोठी थकबाकी दिसत आहे. रक्कम जमा असतानाही विक्रीकर विभागाने भल्या मोठ्या थकबाकी वसुलीच्या नोटीसा व्यापार्‍यांना पाठविल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे 31 हजार व्यापार्‍यांना अशा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. यात सांगली, मिरजेतील व्यापार्‍यांची संख्या अधिक आहे. यात कोणताही कर भरला नसल्याचे सांगत थकबाकी तातडीने भरावी, असे नमूद करण्यात आले आहे. कित्येक व्यापार्‍यांचे व्यवसाय कर नोंदणी दाखले पूर्वीच रद्द झाले आहेत. थकीत व्यवसाय कर भरुन घेतल्याशिवाय नोंदणी दाखला रद्द करता येत नाही. तरीही अशांना नोटीसा काढण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत विक्रीकर विभागाच्या अधिकार्‍यांना भेटून वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न काही व्यापार्‍यांनी केला. पण याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहा-सात वर्षांची जुनी चलने व कागदपत्रे काढून ती दाखविण्याची आणि विक्रीकर विभागात वारंवार हेलपाटे मारण्याचा नाहक मनस्ताप होऊ लागला आहे. यामुळे व्यापारी अक्षवशः हैराण झाले आहेत. या नोटीसा तातडीने मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी व्यापार्‍यांतून होत आहे.