Breaking News

पाकमध्ये विद्यापीठात दहशतवादी हल्ला, 25 ठार ; चार दहशतवाद्यांना कंठस्नान


 पेशावर/वृत्तसंस्था । 21 - वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात असलेल्या बाचा खान विद्यापीठामध्ये बुधवारी सकाळी एका कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.
पाकिस्तानातील बाचा खान विद्यापीठामध्ये बुधवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये काही विद्यार्थीही आहेत. हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात येते आहे. तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असल्याचे समजते. सुमारे सात ते आठ दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर विद्यापीठाचा परिसर रिकामा करण्यात येत असून, पोलीस आणि संरक्षण दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात असलेल्या बाचा खान विद्यापीठामध्ये बुधवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक अतिथीही विद्यापीठामध्ये आले आहेत. विद्यापीठाच्या आवारात सुमारे 3000 विद्यार्थी आणि इतर उपस्थित होते. या कार्यक्रमावर निशाणा साधण्याच्या हेतूनेच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. येथील पोलीस उपमहासंचालक सईद वझीर म्हणाले, नेमके किती दहशतवादी विद्यापीठाच्या आवारात घुसले आहेत, याची स्पष्ट कल्पना नाही. पण आमचे पोलीसही विद्यापाठामध्ये दाखल झाले असून, दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांकडे ग्रेनेड असून ते स्फोट घडवून आणत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. डिसेंबर 2014 मध्ये पेशावरमधील एका शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर पाकिस्तानने
वायव्य भागातील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उदध्वस्त केले होते.