Breaking News

256 प्रलंबित मस्टर्स बनले डोकेदुखी


हिंगोली, 11 - औरंगाबाद विभागामधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मागील आर्थिक 
वर्षातील 256 मस्टर्स प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मस्टर्सवरील मजुरांची मजुरी पूर्वीच देण्यात आली असून मार्च अखेरमुळे घाईने मस्टर्स ऑनलाईन करणे नडल्याचे बोलले जात आहे. 
औरंगाबाद विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली 
आहेत. यामध्ये पांदणरस्ते, सिंचन विहिरी, शेततळे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. या कामांवरील मजुरांना मस्टर संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मजुरी देण्याच्या सूचना हमी योजना विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही विभागामध्ये तब्बल 256 मस्टर्स प्रलंबित आहेत. या प्रलंबित मस्टर्समध्ये किती मजुरांची मजुरी देणे शिल्लक आहे तसेच किती मस्टर्सवरील मजुरी देण्यात आली, याची माहिती मिळत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने थेट जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. त्यासाठी बैठका घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या बाबत सूत्रांनी सांगितले की, हमी योजनेची कामे व मूल्यांकन पाहूनच मग मस्टर्स ऑनलाईन करणे आवश्यक होते. मात्र अनेक ठिकाणी ता. 31 मार्च निघून गेल्यानंतर मजुरी मिळणार नाही या भीतीने आधी मस्टर्स ऑनलाईन करून घेण्यात आले. मात्र त्यानंतर कामांची तपासणी केली असता, मूल्यांकनानुसार मजुरांची मजुरी अदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.