Breaking News

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन 2015-16 चे उद्घाटन


 नाशिक /प्रतिनिधी। 4 - राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील कारागिरांना प्रोत्साहन मिळते, असे  प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
भारत सरकारच्या विकास आयुक्त (हातमाग) वस्त्र मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोल्फ क्लब येथे आयोजित राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन 2015-16  च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, वस्त्रोद्योग संचालक रिचा बागला, सह व्यवस्थापकीय संचालक डी.एम.बावणे, एक्स्पे समन्वयक दिलीप कुंभारे, एक्स्पो अधिकारी आर.जी.खवास, विपणन अधिकारी विकास काटे आदी उपस्थित होते. श्री.डवले म्हणाले प्रदर्शनाच्या माध्यमातून कारागिरांची कला आणि कौशल्य जनतेसमोर येते. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारची निर्मिती पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळते. नाशिकमध्ये प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मालेगाव हे हातमागावरील कापड निर्मितीचे प्रमुख केंद्र असून येवल्याची पैठणी देखील देश-विदेशात प्रसिद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमती हिरे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने विविध राज्यातील कलाकृती आणि निर्मिती एकाच ठिकाणी असणे हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. अशी निर्मिती करणार्‍या कारागिरांना प्रदर्शनामुळे प्रोत्साहन मिळते, असे त्या म्हणाल्या. श्रीमती बागला यांनी प्रदर्शन तीन आठवडे चालणार असून राज्य शासनाने हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविल्याची माहिती दिली. संकेतस्थळाच्या माध्यमातून हातमाग वस्त्र विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळास देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी केंद्र शासनाकडून 18 लक्ष व राज्य शासनाकडून 30 लक्ष अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे.. प्रदर्शनात 11  राज्यातील 48 संस्थांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनाद्वारे विविध राज्यातील ग्रामीण भागातील विणकराद्वारे 
उत्पादित हातमाग कापड एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.