Breaking News

बार असोसिएशन पाच जागांसाठी 16 मैदानात

 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 - जिल्हा न्यायालयातील शहर वकील संघाच्या (बार असोसिएशन) कार्यकारिणीवर सात विधिज्ञांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष-उपाध्यक्षांसह पाच जागांसाठी 16 उमेदवार मैदानात असून त्यासाठी 22 जानेवारीला मतदान होणार आहे. 
शहर वकील संघाच्या निवडणुकीमध्ये सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी अँड. कल्याण पगार यांनी मंगळवारी वकील संघाची कार्यकारिणी बिनविरोध झाल्याचे सांगितले. कार्यकारिणीच्या 7 जागांसाठी 10 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 4 जणांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरित 7 जणांची कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये अँड. सय्यद वसीम गुलाम, गौरव दांगट, अनिल भापकर, योगेश तोडमल, प्रवीण पालवे, योगेश गेरंगे आणि मीनाक्षी कराळे-सावंत यांचा समावेश आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव आणि सहसचिव अशा प्रत्येकी एका जागेसाठी 16 जण मैदानात आहेत. अध्यक्षपदासाठी अशोक बंग, लक्ष्मण कचरे, रवींद्र बेदरे निवडणूक लढवित आहेत. उपाध्यक्षपदासाठी सतीश गुगळे, संदीप म्हस्के, जया पाटोळे, नितीन जंबुरे यांच्यात लढत होत आहे. सचिव पदासाठी राजू कावरे, कृष्णा झावरे, लक्ष्मीकांत पटारे असे तिघे मैदानात आहेत. सहसचिव पदासाठी मनीषा शिंदे-केळगंद्रे व वृषाली तांदळे यांच्यात थेट लढत आहे. सहसचिवपदासाठी पराग काळे, निलेश हराळे, संदीप पडोळे, मनोज कदम असे चौघे रिंगणात आहेत. पाच जागांसाठी 22 जानेवारीला मतदान होत असून त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालयात काम करणारे आठशेच्या वर विधिज्ञ मतदान करणार असून उमेदवारांचा जोरात प्रचार सुरू झाला आहे.