Breaking News

समाजसेवकांनी वंचितांपर्यंत शासकीय योजना पोहचवाव्यात- बडोले


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुरस्कार प्राप्त संस्था व समाजसेवकांनी शासन व वंचित घटकातील दुवा म्हणून कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2017-18 करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 62 व्यक्ती व 6 संस्था, तसेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 1 व्यक्ती व 1 संस्था आणि संत रविदास पुरस्कार 4 व्यक्ती व 1 संस्था असे एकूण 67 व्यक्ती व 8 संस्थांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर, आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबई येथील इंदु मिल जागेचे हस्तांतरण,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, युपीएससी मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, तसेच नोकरी करणा-या मागासवर्गीय महिलांसाठी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे वसतिगृह आदी विविध क्षेत्रात शासनाने आजपर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आली आहे. बौध्द विवाह कायद्याचे काम लवकरच पुर्णत्वास येणार आहे. आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे. रोजगार मिळवून देण्यासाठी बार्टीच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या या सर्व योजना मागासवर्गीय लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुरस्कार प्राप्त समाजसेवक व संस्थांनी यापुढेही अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 62 व्यक्तींना देण्यात आला असून प्रत्येकी 15 हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच 6 संस्थांना प्रत्येकी 25 हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संत रविदास पुरस्कार 4 व्यक्ती व 1 संस्था यांना देण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला 21 हजार रूपये रोख व संस्थेला 30 हजार रूपये रोख, तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार एका व्यक्तीला 21 हजार रूपये रोख व एका संस्थेला 30 हजार रूपये रोख, तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यांनी मानले.