Breaking News

घनकचरा व्यवस्थापनासाठी ४ कोटींचे प्रयोजन नगरपरिषदेचा अर्थसंकल्प मंजूर


संगमनेर नगरपरिषदेच्या रामकृष्ण सभागृहात आज {दि. २६} अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी ४ कोटी रुपयांचे प्रयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. सुनील बांगर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसंमतीने तो मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुरुवातीची शिल्लक १० लाख आहे. महसूली जमा ३४ कोटी १६ लाख ८६ हजार असून भांडवली जमा १५९ कोटी १५ लाख १६ हजार आहे. एकूण १९३ कोटी ४१ लाख ९६ हजारांचा असलेल्या या अर्थसंकल्पात जमा रक्कम दर्शवून महसूली खर्च २९ कोटी २२ लाख ९७ हजार व भांडवली खर्च १६४ कोटी ११ लाख ७० हजार असे एकूण १९३ कोटी ३४ लाख ६७ हजार दाखविण्यात आले आहेत. ७ लाख २९ हजार शिलकेचा अर्थसंकल्प सभागृहापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. यात १२५ कोटी रुपयांची भुयारी गटारे, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत तर घनकचरा व्यवस्थापनासाठी ४ कोटी रुपये, १४ व्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत प्रयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या सादर झालेल्या वित्तीय अर्थसंकल्पात पाणीपट्टी करात नाममात्र १०० रुपयांची वाढ करत इतर कोणत्याही करत वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या अर्थसंकल्पीय चर्चेत विश्वास मुर्तडक, किशोर पवार, शैलेश कलंत्री, हिरालाल पगडाल, दिलीप पुंड, सुहासिनी गुंजाळ आदींसह उपस्थित सर्वच नगरसेवकांनी सहभाग घेतला.