Breaking News

सभापती व अध्यक्षांनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा


विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त प्रशासनातर्फे विधान मंडळातील सुरक्षा व्यवस्था, दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच अधिवेशनासाठी येणा-या सदस्यांची निवास व्यवस्था तसेच वाहन व्यवस्थेसंदर्भात करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर आणि विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत घेतला. विधान मंडळाच्या सभागृहात आयोजित पुर्वतयारी आढावा बैठकीस विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सचिव विविध विभाग प्रमुख, विधानसभेचे अवर सचिव रविंद्र जगदळे तसेच सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार 4 जुलैपासून सुरू होत असून अधिवेशनानिमित्त करावयाच्या विविध कामांचा आढावा विधान परिषदेचे सभापती राम राजे नाईक निंबाळकर व विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विभागनिहाय घेतला. विधीमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत अधिकृत सुरक्षा पासेसशिवाय परिसरात प्रवेश राहणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी सुरक्षा पास जवळ बाळगावेत.विधान भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून या परिसरात 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर डिजीटल छायाचित्र घेणारी अत्याधुनिक यंत्रणा असून स्कॅनर मशीनसुध्दा बसविण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली. पावसाळी वातावरण असल्यामुळे विधान मंडळ परिसर, आमदार निवास, रवीभवन तसेच कर्मचा-यांची निवास स्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणी पुरवठ्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वैद्यकीय सुविधा पुरेशा उपलब्ध करून द्याव्यात. ॲम्बुलन्सची व्यवस्था चोख ठेवावी. शॉर्ट सर्किट, आग लागणे, वादळामुळे झाडे पडणे आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्व यंत्रणेने कार्यतत्पर राहावे, अशा सूचना करण्यात आल्यात. अधिवेशन काळात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती देतांना विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले की, अधिवेशन काळात वाहन व्यवस्थेसाठी विविध जिल्ह्यातून वाहनांचे अधिग्रहन करण्यात येते. परंतु यावर्षी पावसाची परिस्थिती हाताळण्यासाठी वाहन अधिग्रहीत न करता पर्यायी व्यवस्था म्हणून ‘ओला’ टॅक्सी ची सुविधा कॉर्पोरेट प्लॅननुसार करण्यात आली आहे. मंत्रालयीन अधिका-यांना जीप ऐवज ओला ची सुविधा झाली असून आजपर्यंत 107 ओला ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे पार्किंगचा प्रश्न कमी झाला आहे. मंत्रिमंडळ सदस्य तसेच वरिष्ठ सचिवांना भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी केवळ 124 वाहने अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विधीमंडळासाठी येणा-या मंत्रालयीन विभागांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पावसामुळे अडचण होणार नाही, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्यक सर्व सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. दूरध्वनी, इन्ट्रानेट व इंटरनेटची सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुयोग येथे पत्रकारांची निवास व्यवस्था असून येथे माध्यमकेंद्र सुरू झाले आहे. रवीभवन, नागभवन आदी ठिकाणी प्रतोद यांची निवास व्यवस्था असून निरंतर विद्युत राहावी यासाठी जनरेटरची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. अधिवेशन काळात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वच्छता व पाणी पुरवठा नियमित करण्यात येईल. दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाईल टॉयलेट व्यवस्था ठेवण्यात आली असून 24 बाय 7 पाणी पुरवठा करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास दोन मोठे टँकर राखीव ठेवण्यात आले आहे. साचलेले पाणी त्वरीत काढले जाईल. आपात्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे महापालिका आयुक्त विरेंद्र सिंग यांनी सांगितले. तर विधान भवन, रवीभवन, आमदार निवास, 160 खोल्यांचे जाळे, सुयोग पत्रकार भवन येथे वैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. तसेच मोर्चा पॉईंट, एलआयसी चौक, लिबर्टी चौक, मॉरिस टी पॉईंट येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.