Breaking News

आंब्यांची आवक वाढली, दर पडले


सोलापूर - आंब्याची आवक दुपटीने वाढल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. बाजारात आंबे आता 60 ते 70 रुपये किलो मिळत आहेत. शहरात केशर, बदाम, लालबाग या आंब्यांना जास्त मागणी आहे. हापूस आंब्यांचेही दर निम्म्याने उतरले आहेत.
 
रत्नागिरी, हैदराबाद, वारंगल, तामिळनाडू, गुजरात, कोकण, नाशिक मार्केट आणि औरंगाबाद जिल्हा आदी ठिकाणांहून शहरात रोज मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी येत आहेत. हैदराबाद आणि कोकणामधून लालबाग, तोतापुरी आंब्यांची आवक होत आहे, असे व्यापारी शकील जहागीरदार यांनी सांगितले. केशर आंबा मे महिन्याच्या प्रारंभी 200 ते 225 रुपये दराने विक्री होत होते. त्यांचे दर अर्ध्यावर आले आहेत. 

हापूस आंबे 700 ते 800 रुपये डझन या दराने मिळत होते. त्यांचे दर आता 500 रुपयांच्याही खाली आले आहे. शहरातील विविध भागात आंबे विक्री करणारे बहुतांश विक्रेते कृषी उत्पन्न बाजार समितीतून आंबे आणतात. किमती उतरल्यामुळे आंब्यांची हातोहात विक्री होत असल्याचे व्यापारी सांगतात. 70 ते 90 रुपये किलो दरानेही आंबे विक्री होत आहेत. मागील आठवड्यापेक्षा साधारणतः 20 ते 25 रुपयांनी आंबे स्वस्त झालेले आहेत.