Breaking News

निमगाव वाघा येथे ऐन उन्हाळ्यात फुलले पक्ष्यांचे नंदनवन


अहमदनगर - दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना पक्षी पाण्यासाठी टाहो फोडताना दिसत आहे. मात्र नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांचे नंदनवन फुलले आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना जगविण्यासाठी नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावात पक्ष्यांची पाणपोई सुरु करण्यात आलेली आहे.

मध्यंतरी दुष्काळामुळे गावात अनेक पक्षी पाण्याअभावी बेशुध्द अवस्थेत अढळल्यानंतर डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी पक्ष्यांसाठी पाणपोईचा उपक्रम सुरु केला. दरवर्षी या पाणपोईची व्याप्ती वाढत असून, गावात रिकाम्या पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम कापून तर गाडगे झाडाला दोरीने लटकवून पाणपोई उभारण्यात आलेली आहे. यामुळे परिसरात पक्ष्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होवून, पाण्याची सोय झाल्याने पक्ष्यांच्या वावराने किलबील वाढली आहे. या पाणपोईत दररोज सकाळी पाणी टाकण्याचा संस्थेच्या प्रतिनिधींचा दिनक्रम ठरलेला आहे. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. 

पै.डोंगरे प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तीला जमेल त्या पध्दतीने पक्षींसाठी पाण्याची सोय करण्याचा आग्रह धरत आहे. पक्षी हे नैसर्गिक चक्राचा घटक असून, पिकांवरील रोगराई कमी करण्यासाठी देखील त्यांची मदत होते. त्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी असून, नागरिकांना देखील पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, गौतम फलके, मयुर काळे, भारत काळे, सोमनाथ डोंगरे, आदर्श माता द्रोपदा डोंगरे, अक्षय पवार, कांचन डोंगरे, संतोष फलके, राधिका डोंगरे, पै.स्वराज डोंगरे, कुमारी येवले, सोनू येवले, आबई डोंगरे, संगीता डोंगरे, संजय पुंड आदि परिश्रम घेत आहे.