Breaking News

वाळू तस्करांच्या धुमश्चक्रीने ‘वळण’ पुन्हा चर्चेत!


राहुरी विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील वळण येथे रात्री वाळूतस्करीच्या कारणावरुन बंड्या नावाच्या तरुणाला पाच ते सहा वाळू तस्करांनी गज, लाठ्या-काठ्यांनी चोप दिल्याची घटना घडली. यात या तरुणाचा हात व पाय फॅक्चर झाला. या वादात नागरिकांनी एक वाळूचा ट्रक्टर महसूलच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील वळण हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दोन दिवसांपूर्वी वळण गावात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करीतून हाणामारीची ही घटना घडली. वळण येथील बंड्या नामक वाळूतस्कर तरुणाचे ट्रक्टर व ट्रॅली असलेले वाहन काही तरुणांनी अडविले. त्याठिकाणी बंड्याने येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी बंड्याला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाठी काठी गजाने येथेच्छ चोप दिला. त्यामुळे तो रक्तबंबाळ आणि बेशुद्ध झाला. काहींनी बंड्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. मात्र तेथे डाॅक्टर उपस्थित नसल्याने त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वाळूतस्कर असलेल्या बंड्याला वाळूवरून मारहाण झाली की माती उचलण्याच्या करणावरून मारहाण झाली, याविषयी स्थानिक नागरिकांमधून तर्कवितर्क लढविले जात आहे.