Breaking News

नाथपंथी गोसावी समाजाचा तहसीलवर मोर्चा


जामखेड / श. प्रतिनिधी 
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच विविध मागण्यांसाठी जामखेड येथिल नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने खर्डा चौक येथे रास्ता रोको करुन पुढे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरातील तपनेश्‍वर भागातील नाथनगर या ठिकाणाहून गुरुवार दि. 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा खर्डा चौकात आला असता, यावेळी संतप्त मोर्चेकरांनी काही काळ या ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. यानंतर पुढे हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन डवरी गोसावी समाजाचे जामखेड तालुकाध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले होते. तहसील कार्यालय परिसरात हा डवरी गोसावी समाजाचा मोर्चा आल्यानंतर समाजातील महिला व नागरिकांनी आपल्या भावणा व्यक्त करताना म्हणाले की, धुळे येथील हत्याकांडातील लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे राईनपाडा गावातील सर्वच लोकांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. खूनाची घटना घडल्यापासुन आमच्या लोकांना भिक्षा मागण्यासाठी जाताना भीती वाटू लागली आहे. गेल्या चार पाच दिवसांपासुन भीतीपोटी घराबाहेर पडू न शकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. हा हल्ला फक्त गोसावी समाजावर झालेला नसुन, सर्व भटक्या विमुक्त समाजावर झाला आहे. घटनेला चार-पाच दिवस होवूनही मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली नाही, ती तातडीने देण्यात यावी. या हत्याकांडाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात फिरणार्‍या या समाजाला शासनाने ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. 
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सिद्धार्थ घायतडक, अ‍ॅड. अरुण जाधव, बापु गायकवाड, नगरसेवक अमित जाधव, संदीप गायकवाड, नामदेव राळेभात, डवरी गोसावी समाजाचे तालुकाध्यक्ष अजिनाथ शिंदे, धनंजय पवार, मोहन चव्हाण, संतोष शेगर, शंकर शेगर, भाऊराव सावंत, फुलाबाई शेगर, विकी सदाफुले, भिमराव चव्हाण, अमजत पठाण, बापुसाहेब चव्हाण, समीर पठाणसह गोसावी समाजातील महीलांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.