Breaking News

निराधार मानधनासह पिक कर्जप्रश्‍नी किसान सभेची निदर्शने


अकोले / ता. प्रतिनिधी
निराधार योजनेच्या लाभार्थींना गेले अनेक महिने, त्यांचे संपूर्ण मानधन देण्यात आलेले नाही. शेतकर्‍यांना पिक कर्ज, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देतानाही बँकांकडून सातत्याने अडवणूक होत आहे. किसान सभेच्या वतीने या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी अकोले येथील एस.बी.आय. बँकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
निराधार योजनेचे मानधनामध्ये गेली अनेक महिण्यांपासून अनियमितता दिसून येत आहे. किसान सभेने मानधन नियमित मिळण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. आंदोलनानंतर काही महिण्यांचे अंशत: मानधन वर्ग करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. बँकांना याद्या पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र अकोले शााखेच्या एसबीआय बँकेमध्ये या याद्यांनुसार अद्यापही पैसे वर्ग झालेले नाहीत. येथील अधिकार्‍यांकडे यासंदर्भात वारंवार मागणी करूनही हा प्रश्‍न सुटलेला नाही.
शेतकर्‍यांना कर्ज वितरणाबाबतही शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याच्या, अनेक तक्रारी शेतकरी करत आहेत. निराधारांना व शेतकर्‍यांना बँकेत तासंतास रांगांमध्ये उभे राहावे लागते. वेळ खर्च करावा लागतो. मात्र येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने कामे होत नाहीत. शेतकरी व गरीब निराधार यामुळे त्रस्त झाले आहेत.


निराधार योजनेच्या लाभार्थींना दरमहा वेळेवर मानधन मिळेल, याची दक्षता घेण्यात यावी. मानधनाच्या याद्या मिळताच मानधन बँकांनी तातडीने वर्ग करावे. मानधनाच्या चौकशीसाठी आलेल्या निराधार बांधवांना बँक व तहसील कार्यालयात सन्मानाची व तत्परतेची वागणूक मिळावी. मानधनाची स्थिती दर्शविणारे सूचना फलक बँकेत लावण्यात यावेत. वृद्धांना पासबुक भरून देण्यासाठी व बँकेच्या इतर कामासाठी स्वतंत्र रांग असावी. शेतकर्‍यांची अडवणूक न करता त्वरित पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे. थकबाकीदार शेतकर्‍यांचे फोटो बँकेत लाऊन त्यांची बदनामी करण्याची क्रूर पद्धत तातडीने बंद करावी. मुद्रा लोनसाठी स्वतंत्र माहिती केंद्र स्थापन करून युवकांना या संदर्भात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखवावी यांसह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, जुबेदा मणियार, आराधना बोर्‍हाडे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बँक व्यवस्थापक व तहसील कार्यालयाला यावेळी निवेदन देण्यात आले. सदरच्या प्रश्‍नावर बैठक घेवून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी किसान सभेला दिले.