भुगोलाच्या पुस्तकात चक्क गुजरातीचे धडे... विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड

मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मराठी माध्यमातील पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. या प्रकारावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची जोरदार झोड उठवली आहे. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. आज विधान परिषदेमध्ये मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करण्यात येणार होता. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

त्या पुस्तकात एकही शब्द आणि पान गुजराती नाही. बाइंडिंगवाल्यांनी ती चूक केली असल्याची शक्यता असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी ’गुजराती पाने असलेले पुस्तक आणि त्यातील पाने तुम्हीच जोडून आणली असल्याचा आरोप तटकरे यांच्यावर केला. चंद्रकांत पाटलांच्या या आरोपाला उत्तर देताना तटकरे म्हणाले.. आयुष्यभरात असे काम कधी केले नाही, आम्ही छापून आणले आहे, असे जर सिद्ध झाले, तर याच सभागृहात मी विष घेऊन आत्महत्या करेन असा संतप्त पवित्रा तटकरे यांनी घेतला. त्यावर सभापतींनी असे काही बोलू नका, असा सल्ला तटकरेंना दिला. त्यावर ही चेष्टा नाही..माझे हे शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे सांगत तटकरेंनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर विरोधीपक्षाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.