गोसावी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून निषेध
राहुरी / ता. प्रतिनिधी
सोशल मिडीयावरून पोरधरी संदर्भात पसरविण्यात येणार्या अफवामुळे राज्यात अनेक ठिकाणी भटके विमुक्त जाती-जमातीच्या कलावंतांना बेदम मारहाण व ठार मारण्याच्या घटनेचा, राहुरी येथे अहमदनगर जिल्हा दशनाम गोसावी समाजाच्यावतीने तहसीलदार व पोलिस निरिक्षक यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला.
दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष दिलीप गोसावी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल दौंडे व पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांना समाज बांधवांनी शिष्टमंडळाने भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भटके जाती जमाती व नागपंथी डवरी गोसावी जातीमधील कलावंत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतात मात्र, सोशल मीडियावर पोरधरीची खोटी अफवा पसरवण्यात येत असल्याने राज्यात पोरधरी या संशयावरून त्यांना बेदम मारहाण व जीवंत ठार करण्याच्या घटना घडत आहेत. औरंगाबाद, नागपुर, नांदेड या ठिकाणी मारहाण तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राईनपाडा येथे डवरी गोसावी समाजाच्या पाच निरपराध लोकांना जमावाने ठेचून जीवंत ठार मारल्याची निर्दयी घटना घडली. सोशल मिडीयावरील खोट्या अफवामुळे पाच निरपराधांचा बळी गेला असुन, शासनाने या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच, खोट्या अफवा पसरविणार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. भटक्या जाती जमातीला संरक्षण द्यावे, रेणके कमिशनची अंमलबजावणी करून भटक्या जाती जमातीला रेणके कमिशनच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली असुन, निवेदनावर दिलीप गोसावी, कैलास गोसावी, रविंद्र गोसावी, किशोर गोसावी, शंकर गोसावी, विकास गोसावी, मनोज गोसावी, धनंजय गिरी, आकाश गोसावी, सचिन गोसावी आदींची नावे आहेत. यावेळी इतर समाजबांधवांनीही उपस्थित राहुन घटनेचा निषेध करून, दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करीत दशनाम गोसावी समाजाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला.