Breaking News

अवजड वाहतूक बंद करण्यासाठी असाही एक प्रयत्न


कोल्हार खुर्द / वार्ताहर 
कोल्हार खुर्द येथील प्रवरा पात्रावर असलेल्या जुन्या पुलाची अवस्था गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली असून, सदर पूल हा अवजड वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे चार वेळेस प्रयत्न केले. मात्र बेशिस्त वाहनचालकांमुळे या पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच होती. अखेर सदर विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूला आता बांधकाम करून हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. 
कोल्हार खुर्द येथील प्रवरा पात्रावरील जूना पूल गेल्या दोन वर्षांपासून अवजड वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक झाला आहे, त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे फलक सुरुवातीला पुलाच्या सुरुवातीला लावण्यात आले. हे फलक अवघ्या पंधरा दिवसात रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी तोडून टाकून सोयीस्कर पद्धतीने वाहतूक सुरू केली. त्यानंतर पुन्हा संबंधित विभागाने पुलाच्या सुरुवातीला मैलाचे दगड लावून त्यावर रेडियम लावले आणि पुन्हा सदर पूल वाहतुकीसाठी बंद असल्याचे जाहीर केले, मात्र हे दगड देखील समाजकंटकांनी पाडून वाहतूक सुरु केली, यानंतर मात्र संबंधित विभागाने सदर पुलावर मोठे लोखंडी बॅरियर उभे केले आणि त्यावर आडवे लोखंडी चॅनेल टाकून सदर पूल वाहतुकीसाठी बंद केला खरा, परंतु हा प्रयत्न देखील सदर विभागाचा फोल ठरला, सदर लोखंडी बॅरियर अज्ञात चोरट्यांनी दोर लावून पाडून चोरून नेल्याने मात्र संबंधित विभाग हतबल झाल्याचे दिसून आले. 
मात्र तरीदेखील संबंधित विभागाने आपले काम योग्य पद्धतीने पार पाडत, आता या पुलावर दोन्ही बाजूने विटांचे पक्के बांधकाम करून पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे.