Breaking News

डॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सूडातून : अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर


जामखेड / श. प्रतिनिधी 
धनगर आरक्षणाची मागणी करणारे डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहकार्‍यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे व करण्यात आलेली कारवाई राजकीय सूडातून करण्यात आली आहे, याला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी जामखेड येथे डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्या भेटीदरम्यान केला. 
अहील्यादेवींचे जन्मस्थळ असलेले चौंडी हे गाव त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे. मात्र या सरकारने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय भाषणांचे स्थळ निर्माण झाले आहे. तसेच डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यावर राजकीय अकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी गेल्या दीड महिन्यापासुन जामखेड येथील जेलमध्ये असलेले डॉ. इंद्रकुमार भिसे यांची भेट घेण्यासाठी गुरूवारी भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर आले होते. त्यांनी सकाळी ठीक 10 वाजता जामखेड येथील कारागृहातील डॉ. इंद्रकुमार भिसे यांची भेट घेवून विचारपूस केली. 
यानंतर डॉ. आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी सांगितले की, चौंडी येथील 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहील्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी फक्त पत्रके भिरकावली आहेत. दगड मारणारे दुसरेच होते. तरीदेखील त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला. हे शडयंत्रच आहे. यापुर्वी डॉ. भिसे यांनी पंढरपूर येथे समाजाच्या मेळाव्यात आरक्षणाची मागणी केली. त्याच्यामुळेच राजकीय आकसापोटी गुन्हे दाखल केले. या केससंदर्भात त्यांच्या सुटकेसाठी जामीनासंदर्भात आपण औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना लवकरच जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आरक्षणासंबधीत बोलताना म्हणाले की, जोपर्यंत बहुजनांची सत्ता ताब्यात येणार नाही तोपर्यंत, बहुजन समाजाचे प्रश्‍न सुटणार नाहीत. 
डवरी गोसावी समाज धुळे प्रकारानंतर जागृती झाली आहे. या संदर्भात तातडीने मुख्यमंत्री यांना आपण भेटून, या समाजाला पास देण्यात यावे, तसेच रमाई आवास पंतप्रधान योजना त्याचबरोबर उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे यांसह आदी मागण्यांसाठी भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी नगरसह इतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते नवनाथ पडळकर, अ‍ॅड. अरूण जाधव, प्रा. मधुकर राळेभात, तहसीलदार विशाल नाईकवडे, सुभाष शिंदे, निलेश गायकवाड, बापुसाहेब गायकवाड, दत्ता करे, उत्तम मदने, सुरज सोट, भाऊसाहेब कोरटकर, बापूसाहेब ओहोळ, अमित जाधव, विकी सदाफुले, अरूण डोळस, सागर सदाफुले, संतोष गर्जे, धनराज पवार, अवधूत पवार, प्रा. विकी घायतडक, श्रीकांत कदम, दादा मोरे, विकास मासाळ, राजेश वाव्हळ, द्वारका पवार, फिरोज बागवान, रवि सोनवणे, मनिष घायतडक सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा फसवी
धनगर, वंचित आदीवाशींसाठी संभाव्य लढा उभारावा लागणार आहे. यासाठी आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागत आहोत, जर या जागा मिळाल्या नाहीत तर, स्वतंत्र निवडणूका लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामध्ये वंचित घटकांना बरोबर घेवून वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी दीड पट हमीभावाची केलेली घोषणा फसवी आहे. हे केंद्र सरकार मनमोहनसिंगांचा कित्ता गिरवत आहे. भिडे संदर्भात बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री भिंडेना पाठिशी घालत आहेत.