Breaking News

अभिनेत्री राणी मुखर्जीसह ४६ लोकांना ‘महसूल’च्या नोटिसा


शिर्डी / प्रतिनिधी

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी आणि पंचतारांकित हॉटेल उद्योजकांसह ४६ लोकांना महसूल विभागाने अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. निघोज हद्दीतील २० तर निमगाव-कोऱ्हाळे हद्दीतील २६ अशा ४६ जणांना महसूल खात्याने नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यात पंचतारांकित हॉटेल उद्योजकांसह सिनेअभिनेत्री राणी मुखर्जीचाही समावेश आहे. 

शिर्डीतून जाणाऱ्या या ओढ्याला पूर आला तर किती गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, ही बाब महसूलच्या लक्षात आल्यानंतर ४ दिवसांपूर्वी या ओढ्याची पाहणी करण्यात आली. शिर्डीतून वाहणारा हा ओढा फार जुना आहे. नांदुरखी, कोऱ्हाळे येथून या ओढ्याचा उगम होतो. पुढे तो शिर्डी, निघोज, निमगाव, रुई व शिंगवे गावाच्या शिवारात वाहत जातो. हे पाणी गोदावरीला मिळते. नांदुरखी गावापासून आलेल्या या ओढ्याचे शिर्डीच्या पुढे एका लहानश्या नालीत रुपांतर होते. शिर्डीच्या पुढे नगर-मनमाड रोडच्या पलीकडे गेल्यानंतर हा ओढा लहान होत गेला आहे. कागदोपत्री केवळ अस्तित्वात असलेल्या या ओढ्यावर लहान-मोठे अनेक व्यापारी, उद्योगपती काही राजकीय पुढारी यांचे अतिक्रमण उभे आहे. यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलचाही समावेश आहे. ओढा हा पाटबंधारे खात्याच्या मालकीचा असून त्यालगतच्या जागेला मोठा भाव आलेला आहे. या ओढ्यावरच्या अतिक्रमणाला हात लावण्याचे धाडस राहाता महसूल विभागाने कधी दाखविले नाही. दि. २१ जून रोजी जो पाउस झाला, त्या पाण्याने रौद्ररूप दाखविले. पाणी जाण्यास वाहून जागा नसल्याने त्यावेळी अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. नगर-मनमाड रोडवर वाहतूक खोळंबली. यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. यात पोलीस स्टेशन शासकीय कार्यालय हे सुद्धा सुटले नाही. ओढ्यालगत अतिक्रमण वाढताना संबंधित शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोठा असलेला हा ओढा लहान रुपात दिसतो आहे. ज्या गर्भश्रीमंतांनी या ओढ्यावर अतिक्रमण केले. त्यांच्या धाडसाची किंमत गरिबांना मोजावी लागली. य ओढ्यात १२ लोकांनी सांडपाणी सोडले. ४ धर्माशाळांनीसुद्धा पाणी सोडून दिले. २ पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाने हा ओढाच बंदिस्त केला आहे. तर १८ लोकांनी अतिक्रमण केले. या विविध कारणामुळे ४६ लोकांना राहाता महसूल विभागाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.