Breaking News

गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी मनरेगाच्या सहयोगातून विशेष मोहिम - पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती



नागपूर 
राज्याचा महत्‍त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांची स्वच्छता करुन या किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मनरेगा तथा रोहयो आणि पुरातत्व विभागाच्या सहयोगातून विशेष मोहिम राबविण्यात येईल. यामुळे रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, अशी माहिती पर्यटन आणि रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल,असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी मनरेगा अंतर्गत मजुरांमार्फत किल्ल्यांची साफ-सफाई केली जाणार आहे. सुमारे शंभर दिवसांमध्ये किल्ल्यांची साफ-सफाई केली जाईल. तसेच किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी किल्ल्यांची स्वच्छता, दुरुस्ती, किल्ला परिसरात वृक्षारोपण, तलावांची स्वच्छता, झाडांची कटाई आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहितीही श्री. रावल यांनी दिली.

या मोहिमेसंदर्भात नियोजन करण्यासाठी मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे बैठक झाली. मोहिमेच्या यशस्वितेसाठी व त्याची अंमलबजावणी कशी करावी यासंदर्भात सविस्तर नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे,रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, मनरेगाचे आयुक्त ए. एस. आर. नायक,राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन विभागाचे उपसचिव संजय भांडारकर आदी उपस्थित होते.