Breaking News

विधिमंडळ हीच सर्वोच्च संस्था - उपसचिव सतीश थिटे



नागपूर 
विधिमंडळात पारित होणारा राज्याचा अर्थसंकल्प,लोककल्याणकारी कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असली तरी शासन आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम विधिमंडळ करीत असते. त्यामुळे विधिमंडळ हीच सर्वोच्च संस्था असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव सतीश थिटे यांनी आज येथे केले.

विधानभवन येथे वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने प्रिमिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रिमिअर अकॅडमीचे संचालक डॉ. सुरेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

विधिमंडळाचे कामकाज, रचना आणि कार्यपद्धती सांगताना श्री. थिटे म्हणाले,विधिमंडळाने मान्यता दिलेले अर्थसंकल्प, कायदे आणि नियमांची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होत आहे की नाही, यावर निगराणी ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या 35 समित्या कार्यरत असतात. या समित्या एकमेकांशी सुसंगतपणे काम करीत असतात. या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील आमदारही सदस्य असतात. असे सांगून या 35 समित्यांचे महत्व त्यांनी सांगितले.