वारकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मिरजगाव / प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी जाणार्या वारकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जि.प. सदस्य गुलाब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिराचा अधिकाधिक वारकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कै. माजी खा. बाळासाहेब विखे फाऊंडेशनच्यावतीने नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगावच्या दक्षिणमुखी मंदिराच्या आवारात हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर सुरु करण्यात आले असून, हे शिबीर पुढील आठ ते दहा दिवस सुरु ठेवण्यात येणार आहे. आरोग्य शिबिराच्या या उद्घाटन प्रसंगी जि.प. सदस्य गुलाब तनपुरे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, डॉ. पंढरीनाथ गोरे, डॉ. रामदास सूर्यवंशी, सचिन घुले, बापूराव गायकवाड, सोपानराव कोल्हे, डॉ. चंद्रकांत कोरडे, लहू वतारे, अभय खेतमाळस, डॉ. विजय हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये दिंडीतील सर्व वारकर्यांवर मोफत तपासणी करुन, त्यावर उपचार करण्यात येणार आहे. यात चांगल्यात चांगले उपचार करण्यात येणार असून, विखे फाऊंडेशनचे 6 डॉक्टर अहोरात्र सेवा देणार आहेत. एखाद्या वारकरी रुग्णांना जास्त त्रास होत असल्यास जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीचे उपचार करण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणी शिबाराच्या उद्घाटनानंतर पंढरपूरच्या आषाढी वारीतील अनेक रुग्णांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आहे.
