Breaking News

समाजमाध्यमांचा वापर समाजहितासाठी व्हावा - ब्रिजेश सिंह



नागपूर  
आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा वापर होत आहे. समाजमाध्यमांचा वापर करताना इतरांच्या संवेदना, सहनशीलता व दृष्टी यावर आघात करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. समाज माध्यमांचा वापर समाजहितासाठी करावा, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

प्रेस क्लबच्या सभागृहात माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फेक न्यूज-परिणाम आणि दक्षता’ या विषयांवर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत श्री. ब्रिजेश सिंह बोलत होते.

यावेळी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, दै. हितवादचे शहर संपादक राहुल पांडे, नागपूर विद्यापीठाचे जनसंवाद विभागाचे प्रा. मोईझ हक यांची प्रमुख उपस्थित होती.

श्री. सिंह म्हणाले, आपल्या देशात सत्य सांगण्यावर बंधन नाही तथापि अफवा पसरविण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नाही, याची नोंद घेणे आवश्यक आहे. समाज माध्यमांवर वावरताना आपली ओळख लपवून ठेवता येते व अंतरावर राहून समाजहिताच्या विरोधात उपद्व्याप करता येईल, अशी काही जणांची समजूत दिसते. ती सर्वार्थाने चुकीची आहे, असेही ते यावेळी म्हणाले.