Breaking News

आनंदवाडीच्या पूरग्रस्तांना मिळाली मायेची उब


कोपरगाव शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील चांदेकसारे परिसरातील आनंदवाडी येथे २१ जून रोजी अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरात येथील २५० घरे पाण्याखाली गेली होती. ही घटना समजताच येथील रहिवाशांना मुंबई आणि कल्याण येथील सलग २४ वर्षांपासून येणाऱ्या साई उत्सव मित्रमंडळ संचलित पालखीने २५० सोलापूरी चादरींचे मोफत वाटप करत या पूरग्रस्तांना मायेची उब दिली. 

या उपक्रमाबद्दल सरपंच पूनम खरात, उपसरपंच अशोक होन यांनी साई उत्सव मंडळाला धन्यवाद दिले. तालुक्यातील पोहेगांव मंडळात दि. २१ जून रोजी ७३ मिलीमिटर पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे चांदेकसारे परिसरातील वरच्या भागातून मोठया प्रमाणात पुराचे पाणी आले. परिणामी आनंदवाडी येथील काही घरांची पडझड होवुन २५० घरांत पाणी शिरले होते. या आपत्तीत संजीवनी उद्योगसमुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी निवारण पथकाच्या सहायांने मदत करून ५४ रहिवासीयांची सुटका केली होती. दरम्यान, कल्याण-मुंबई परिसरातील चिकणघर येथील साई उत्सव मित्र मंडळाची साई पालखी गेल्या २४ वर्षांपासून येथे येत असते. सामाजिक बांधिलकीचे भान जपत या पालखीचे कार्याध्यक्ष शालीक भोईर, अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष अल्पेश भोईर, सचिव नंदू पाटील, खजिनदार शरद केने आणि अन्य सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. ‘संजीवनी’चे संचालक संजय होन, माजी सरपंच केशव होन, दिलीप होन आदिंच्या हस्ते वाटप करण्यात आले. शेवटी रावसाहेब होन यांनी आभार मानले.