नगर करमाळा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्या -आ. मुरकुटे
नेवासा (प्रतिनिधी)
पंढरपूर आषाढी पायी वारी करणार्या वारकर्यांना नगर ते करमाळा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे व किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करून साईड पट्ट्याही भराव्यात अशी मागणी नेहमीच पायी वारी करणारे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर ते करमळा टेंभूर्णी या रस्त्यावरून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठा, खानदेश इतर भागातून लाखो भाविक भक्त पायी वारी दिंडीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त जातात. हा पंढरपूर वारी पायी दिंडी रस्ता आहे. आषाढी यात्रेदरम्यान हा रस्ता मोठ्या प्रमाणवर वारकर्यांनी गजबजलेला असतो. परंतु सध्या या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले असून साईड पट्या खचल्या आहेत. तसेच साईड पट्यालगत काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे आषाढी वारी जाणार्या भाविक भक्तांचे पायी चालतांना खूप हाल होतात. तरी सदरील रस्त्यांची दुरुस्ती होऊन साईड पट्ट्या मुरमाने तत्काळ भरून काढावे अशी मागणी होत आहे.
वारीला जाणार्या वारकर्यांचा त्रास लक्षात घेता पायी दिंडी करत असलेल्या मुरकुटे यांना मात्र या त्रासाची जाणीव झाली आहे . त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिकचे मुख्य अभियंत्यांना वरील मागणीचे पत्र दिले आहे. तसेच सदरची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कानावरही घातली आहे. विशेष म्हणजे या मागणीला नामदार चंद्रकांत दादा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खात्यालाही आदेशही दिले आहेत.
