Breaking News

अग्रलेख नितीश-लालू मैत्रीपर्व पुन्हा सुरू

बिहारचं राजकारण प्रवाही आहे. तिथं कधी काय होईल, याचा भरवसा नसतो. आज गळा धरणारे उद्या गळ्यात गळा घालू लागतात, असं वारंवार प्रत्ययाला येतं. लालूप्रसाद यादव यांची राजवट उलथवून टाकून नितीशकुमार यांनी भाजपच्या मदतीनं सत्ता मिळविली; परंतु जेव्हा नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड झाली, तेव्हा त्यांनी भाजपपासून चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला. लालूप्रसाद यादव यांच्यावर असलेल्या पशूखाद्य गैरव्यवहाराच्या आरोपाचा त्यांना विसर पडला. सत्तेसाठी नितीशकुमार कुणाशीही युती करू शकतात, हे दिसलं. बिहारमधील जाती, जमातीचं गणित लक्षात घेऊन आणि मोदी यांची कडवी हिंदुत्त्ववादी प्रतिमा लक्षात घेऊन नितीशकुमार यांनी लालूप्रसादांशी जुळवून घेतलं. 

देशभर मोदी लाट असताना बिहारमध्ये मात्र नितीश व लालू यांनी भाजपच्या विजयाचा वारू रोखला. लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलानं जास्त जागा मिळवूनही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला. त्यानंतर नितीशकुमार यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आलं. त्यांनीही देशातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला ; परंतु अचानक लालू यांच्यावर पशूखाद्य घोटाळ्यातील आरोप सिद्ध व्हायला लागले. सातत्यानं प्रतिमेची काळजी असलेल्या नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन एका 24 तासांत भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळविलं. नितीशकुमार यांनी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं ; परंतु दीड वर्षांनी का होईना, त्यांना त्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला. आता ते नोटाबंदीवर टीका करायला लागले आहेत. देशात भाजपविरोधात वातावरण तयार व्हायला लागलं आहे. त्याची जाणीव झाल्यामुळं आणि लोकसभा निवडणुकीत भाजपवर दबाव आणण्यासाठी त्यांनी आता भाजपवर टीका सुरू केली असावी. आता तर त्यांनी लालूंच्या तब्येतीच्या चौैकशीच्या निमित्तानं भाजपच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण केला आहे.
शिवसेनेनं अगोदरच स्वबळाचा नारा दिला आहे. अकाली दलानंही जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव वाढविला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसा सत्तेतील अधिकाधिक वाट्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांच्यातील ब्लॅकमेलिंगचा खेळ वाढणार आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाला मागच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 16. त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून त्यातील 25 जागा मिळाव्यात, अशी मागणी नितीशकुमार यांच्या पक्षानं केली आहे. भाजपचे 16 खासदार असताना शिवाय त्यांचे दोन मित्रपक्ष सत्तेत सहभागी असताना नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला एवढ्या जागा भाजप देणं शक्यच नाही. मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षानं बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) मित्रपक्षांसमवेत आयोजित केलेल्या आनंदोत्सवात मिठाचा खडा टाकण्याचं काम नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलानं केलं. आगामी लोकसभा निवडणुका मोदी यांचाच चेहरा पुढं करून लढवण्याचा निर्णय भाजपनं घेतला असतानाच, बिहारमध्ये मात्र रालोआचा चेहरा नितीशकुमार हाच असेल, असं संयुक्त जनता दलानं जाहीर केलं आहे. जेडीयूची मजल एवढ्यावरच थांबलेली नाही. बिहारमध्ये जेडीयू हाच भाजपचा मोठा भाऊ असेल, असं त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रात शिवसेनेेनं नेमकी अशीच भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच्या तथाकथित मैत्रीत उभं राहिलेलं वादळ आणि तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, या पार्श्‍वभूमीवर नितीशकुमार यांच्या मैत्रीची भाजपला नितांत गरज आहे, हे उघडच दिसते. हे चित्र पाहूनच आता जेडीयूनंही दंड थोपटले आहेत. बिहारमध्ये झालेल्या सर्व पोटनिवडणुकांत भाजप आणि जेडीयूला पराभव पत्करावा लागला. त्यामुळं ही नितीशकुमार यांच्या पक्षानं दबाव आणखी वाढविला आहे. जेडीयूचे सरचिटणीस पवन वर्मा यांनी नितीश हाच चेहरा ही घोषणा करताच बिहार भाजपचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी त्याला अर्धामुर्धा होकार दिला असून, नितीशकुमार व मोदी हे दोन चेहरे बिहारमध्ये असतील, असं सांगून आपण तडजोडीस तयार असल्याचं सूचित केलं आहे. भाजप आणि नितीशकुमार यांचे परस्परसंबंध गेल्या दोन दशकांत कधी मैत्रीचे, तर कधी दुराव्याचे राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या नितीशकुमारांनी मोदी यांना बिहारमध्ये फिरकूही दिले नव्हते आणि मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केल्यावर तर त्यांनी भाजपशी संबंध तोडून बिहारमधील आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशी दोस्ताना करून राज्यही जिंकलं होतं. गेल्या दोन-चार महिन्यांत भाजप आणि विशेषतः मोदी यांना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांत जी पिछेहाट पाहायला मिळाली आणि सरकारविषयीच्या काही प्रमाणातील नाराजीचे जे दर्शन घडलं, ते बघून नितीशकुमार यांनी पुन्हा कोलांटउडी घेतली आणि ते विरोधकांची भाषा बोलू लागले आहेत. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या देशाच्या आर्थिक मागासलेपणास बिहार, उत्तर प्रदेश, तसेच छत्तीसगड ही राज्यं कारणीभूत आहेत, या शेर्‍याला त्यांनी आक्षेप घेतला. राजकारण हे अळवावरचं पाणी असतं, हे नितीशकुमार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला चांगलंच माहीत आहे. यापूर्वी अरुण जेटली यांनी कोणत्याही राज्याला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्याच मुद्द्यावर तर चंद्राबाबूंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली. आता नितीशकुमार यांनीही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधातील आपलं जुनं तुणतुणं पुन्हा वाजविले आहे. काही महिने सत्तेत एकत्र नांदल्यानंतर एकमेकांचे राजकीय वैरी झालेल्या नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी वातावरणनिर्मिती व्हायला सुरूवात झाली आहे. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. लालूंवर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नितीश यांनी हा फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. फोनवरील या संभाषणात इतर कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली, हे मात्र सांगायला दोन्ही पक्षातील नेते तयार नाहीत.
भाजप मित्रपक्षांना फारसं महत्व देत नसल्याची कुरबुर काही दिवसांतच नितीशकमार यांच्या पक्षातील नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी 25 जागा मिळणार नसतील तर आम्ही स्वबळावर लढायला तयार असल्याचंही संयुक्त जनता दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. भाजपनं नितीशकुमार यांच्या पक्षानं केलेली 25 जागांची मागणी फेटाळल्याचं सांगण्यात येत आहे. जागांसाठीच्या या भांडणामुळेच दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे. भाजपवर दबाव आणण्यासाठी आणि नाही जमलं, तर बाहेर पडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती करून जादा जागा पदरात पाडून घेण्याची खेळी नितीशकुमार करीत आहेत.