Breaking News

बाजार ओट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे; तब्बल 27 लाखांची मंजूरी, लोकप्रतिनिधी निःशब्द का?

अकोले / ता. प्रतिनिधी 
तालुक्यातील समशेरपूर गावात सुरू असलेले, बाजार ओट्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. या कामासाठी 27 लाख रुपये मंजूर असून, हे काम ठेकेदार सात ते आठ लाख रुपयांतच उरकणार असल्याची गाव परिसरात दबक्या आवाजाने चर्चा सुरू आहे.
राज्य सरकारच्या पणन विभागाअंतर्गत समशेरपूर गावातील बाजार ओट्यांना शासनाने तब्बल 27 लाख रुपये मंजूर केले आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या चार ते पाच गुंठ्यांच्या आवारात या बाजार ओट्यांचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेत ठेकेदाराने नाममात्रही लक्ष घातलेले दिसत नाही. या बाजार ओट्यांचे काम अतिशय निकृष्ट पातळीवर सुरू आहे. शासनाने या कामासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या कामात ठेकेदाराने आपला मोठा हिस्सा राखून ठेवत काम सुरू ठेवले आहे. परिणामी खर्चाच्या तुलनेत या कामाला काडीमात्र गुणवत्ता मिळालेली दिसून येत नाही. या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र या भागातील लोकप्रतिनिधींनीच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे काम जैसे थेच सुरू आहे. या कामाला शासकीय अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींचीही भक्कम साथ मिळत असल्याने, या कामाच्या गुणवत्तेवर सर्वसामान्य नागरिक बोलू शकत नाही. बाजार ओट्यांसाठी सिमेंट काँक्रीटच्या टाकलेल्या रिंगा वरच्या वर टाकलेल्या आहेत. त्या रिंगासाठी ठेकेदाराने तळात खोदकाम केलेले नाही. परिणामी या रिंगा हवेत तरंगल्या सारखे चित्र दिसत आहे. जर हे काम जेसीबी मशीनच्या साहाय्याने वरच्या बाजूला उचलले तर पूर्ण साचा उपसून निघून येईल, इतक्या निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे. रिंगाखाली घातलेले दगड, गोटे, सिमेंटच्या गोण्या कामात स्पष्टपणे दिसून येत आहेत. या कामात भराव म्हणून ठेकेदाराने चक्क माती वापरली आहे.ही माती कालांतराने फुगून काम जागेवर उखडण्याची शक्यता आहे.गावात जर एखादा नवखा माणूस दाखल झाला तर, त्याचे पहिले लक्ष या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे जात आहे. ठेकेदार, अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे शासनाच्या निधीला चुना लावण्याचेच काम सुरू असल्याची चर्चा नागरिक दबक्या आवाजात करीत आहे.

या कामाचा ठेका, हा प्रवरा विभागातील एका ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने घेतला आहे. या ठेकेदाराचा आणि आढळा विभागातील लोक प्रतिनिधींचा या कामात निम्मा हिस्सा असल्याची गावामध्ये जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या कामाबाबत अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी ’तेरी भी चूप और मेरी भी चूप, असे म्हणत म्हणत मूग गिळून गप्प बसले आहेत.