बोर्ली समुद्रात बोट बुडून 1 खलाशी बेपत्ता
रायगड : मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या कोळ्यांची बोट बुडून 1 खलाशी बेपत्ता झाला, तर 8 जण सुखरूप पोहून समुद्र किनारी आले. बेपत्ता गणेश विश्वनाथ डोंबे यांचा शोध पोलीस व तटरक्षक दल करीत आहेत. बोर्ली कोळीवाड्यातील गणेश डोंबे (खलाशी), विश्वनाथ डोंबे, कृष्णा डोंबे, नवनाथ डोंबे, शेखर डोंबे, सुहास मुरुडकर, अतिष पंडर, शेषनाथ भगत व मनोहर नागोजी हे नऊ कोळी बांधव रात्रीच्या सुमारास मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात गेले होते. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तारा बंदर ते काशीद दरम्यान बोट बुडाली. बोट बुडताच सर्वांनी समुद्रात उड्या मारून पोहत समुद्र किनारा गाठला. मात्र, गणेश डोंबे हे रात्रीपासून बेपत्ता आहेत.या घटनेची खबर पोलीस व तटरक्षक दलास लागताच त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
