Breaking News

धनगरवाडी येथील एफर्टस अ‍ॅकॅडमीत योग प्रशिक्षण शिबीराचा समारोप


स्पर्धेच्या युगात देखील योग हा निरोगी जीवनाचा मुलमंत्र ठरत आहे. स्पर्धेच्या युगात धकाधकीचे जीवन व तणावग्रस्त बनल्याने मनुष्याला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निरोगी जीवनाचा आनंद घेण्यासाठी योग शिवाय पर्याय नसल्याची भावना नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी व्यक्त केली.
21 जून अंतराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्‍वभुमीवर योगच्या प्रचार व प्रसाराकरिता धनगरवाडी (ता.नगर) येथे नेहरु युवा केंद्र व पतंजली योगपीठाच्या सहकार्याने एफर्टस अ‍ॅकॅडमी (तारांगण) च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या योग प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी गोडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वनाथ खवणेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा योग प्रचारक दिलीप मते, पै.नाना डोंगरे, एफर्टस अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा.अशोक जोगदे, प्रा.सुरेखा जोगदे, प्रा.केतकी जोगदे, अंबिका कुलकर्णी, निता मोटे, नवनाथ वाव्हळ, सय्यद शादाब, अनिल पाटील, जुनेद शेख, कोमल आडेप, कौशिक जोगदे, शैलेश पंडित आदि उपस्थित होते.
पुढे गोडसे म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी बुध्दीमत्तेसह सदृढ आरोग्य महत्त्वाचे आहे. योगातून शरीर व मनाचे स्वास्थ्य उत्तम राहून जीवन आनंदी बनते. प्राचीन संस्कृतीत देखील याचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाररीक, बौध्दिक व मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी योग करण्याचे त्यांनी आवाहन केले.
दि.15 एप्रिल ते 5 जून दरम्यान झालेल्या या प्रशिक्षण शिबीरात जिल्ह्यासह एफर्टस अ‍ॅकॅडमीत शिकत असलेल्या राज्यातील 110 विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. दररोज सकाळ व संध्याकाळ योग प्रचारक दिलीप मते यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार, विविध आसने, प्राणायाम, सिध्दी क्रीयाचे धडे देण्यात आले. या शिबीरात प्रथम आलेली उस्मानाबादची वैष्णवी पाटील हीचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तर शिबीरार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.