किल्ल्यांचा इतिहास सर्वसामान्यां पर्यंन्त पोहचविणार्या साप्ताहिक दुर्गसत्ता चे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले गड, किल्ल्यांचे असतित्व धोक्यात येत आहे. अनेक गड, किल्ल्यांची मोठी दुरावस्था झाली असून, त्या मागचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी मोहिम हाती घेण्याची गरज आहे. गड, किल्ल्यांचे संवर्धन होवून त्याचा प्रचार व प्रसार झाल्यास पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असल्याची भावना इतिहास लेखक साईप्रसाद कुंभकर्ण यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गड, किल्ल्यांचा इतिहास सर्वसामान्यां पर्यंन्त पोहचविण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या साप्ताहिक दुर्गसत्ता चे अनावरण प्रसंगी साईप्रसाद कुंभकर्ण बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश बेंजामिन, राहुल पाटोळे, रवी सेंगर, रॉबिन साळवे, सागर दुसल, राहुल ससाणे, प्रकाश भिंगारदिवे, मायाताई जाधव, महेश गोसावी, लक्ष्मण रणसिंग, संपादक शुभम भिंगारदिवे, लिथिया हिवाळे, सरोजकुमार साळवे, अभिषेक वाकळे, जयंत गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुंभकर्ण म्हणाले की, परिक्रमा 350 किल्ल्यांची दुर्गसत्ता साप्ताहिकाद्वारे ही मोहीम चालू करण्यात आली आहे. शहराच्या ऐतिहासिक वास्तूचा श्वास कोंडला गेला आहे. हा श्वास मोकळा करण्यासाठी दुर्गसत्ता साप्ताहिकाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. इतिहासाची साक्ष देणारे गड, किल्ले यांचा इतिहास लेखाद्वारे जीवंत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या साप्ताहिकाच्या वार्षिक सभासदांना पुढील वर्धापन दिनाच्या दिवशी मोफत गड, किल्ल्यांची भेट घडवली जाणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. राहुल पाटोळे म्हणाले की, नागरिक फक्त गड, किल्ल्यांवर स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी फिरायला जातात. मात्र त्यामागचा इतिहास अनेकांना ज्ञात नसतो. या साप्ताहिकाच्या माध्यमातून गड, किल्ल्यांची माहिती व त्याच्याशी जोडला गेलेल्या इतिहासाची माहिती मिळणार असल्याचे सांगितले. महेश बेंजामिन यांनी गड, किल्ले हे आपल्या संस्कृतीशी जोडलेले गेलेले मौल्यवान रत्न आहेत. त्याचे संवर्धन व पर्यटन दृष्टीने चालना मिळण्यास सर्वसामान्य नागरिकांनी देखील योगदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन आकाश बोरुडे यांनी केले. आभार सुरेश साळवे यांनी मांनले.