Breaking News

शेतकर्‍यांना मोफत बियाणे द्या, अन्यथा आंदोलन करू - राष्ट्रवादी काँग्रेस


सोलापूर - गतवर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनचा पीकविमा मंजूर करा, शेतकर्‍यांना मोफत बियाणे द्या, अन्यथा आंदोलन करू, असा राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. गतवर्षी सुमारे तीन हजार हेक्टरवर मूग, साडेचौदा हजार हेक्टरवर उडीद आणि 35 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. विमा कंपनीने कमी क्षेत्रात पेरणी झालेल्या पिकाला पीकविमा मंजूर केला आहे. मात्र, मोठे क्षेत्र असतानाही सोयाबीनला यातून वगळले आहे. कंपनीने पीकविम्याची प्रतिहेक्टर 800 रूपयांप्रमाणे रक्कम जमा करून घेतली. विमा कंपनीने निव्वळ व्यापारी दृष्टिकोन ठेवला आहे. सध्या कोणत्याही शेतीमालाला हमीभाव नाही. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीही दिली जात नाही. त्यामळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत  सापडला आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीसह महागाई प्रचंड वाढत आहे. शेतकर्‍यांवर यासह इतरही अनेक संकटे असल्याने शासनाने त्वरीत लक्ष घालावे, असे या निवेदनात म्हटले आहे.