Breaking News

डीएसकेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : आर्थिक फसवणूक प्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. याआधी पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. शिरीष यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही. शिरीष कुलकर्णी यांनी आठ दिवसात पोलिसांसमोर हजर व्हावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शिरीष यांना 18 जूनपर्यंत तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिरीष यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. शिरीष कुलकर्णी यांना फेब्रुवारी महिन्यापासून अटकेतून संरक्षण मिळाले होते. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णीदेखील आरोपी आहेत.