Breaking News

फूल शेतीने सामान्याला केले ‘मालामाल’!


लोणी : यमन पुलाटे
सेंद्रिय पध्दतीचा वापर करून कमी खर्चात जादा उत्पन्न देणारी फूल शेती एखाद्याला ‘मालामाल’ करु शकते, हे प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील पुलाटे हे २० वर्षांपासून फुलांची शेती करीत आहेत. 

पुलाटे यांनी त्यांच्या या फूल शेतीमध्ये बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची लागवड केली आहे. सुरुवातीला अनेक प्रश्न त्यांना आले. पण बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनिल बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करत गटांची स्थापना केली. त्यामुळे फूलशेतीला चांगले दिवस आले असल्याचे लक्ष्मण पुलाटे सांगत आहेत. 

येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दंवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पिकसंरक्षण, बाजारपेठ आदींची माहिती दिल्याने फुल शेती यशस्वी करता आली. फूलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय खतांच्या वापरावर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे.

दोन वर्षांपासून प्रयोग यशस्वी 

ऊस पिकांतदेखील झेंडूची फुलशेती फायदेशीर आहे. बाजारपेठ आपल्या हातात नाही. पण गुणवत्ता, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविणे, हे केले तर पिक फायदेशीर ठरते. झेंडू पिकांसाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. यापासून सरासरी ८ ते १० टन उत्पादन मिळून खर्च वजा जाता ७० ते ७५ हजारांचा नफा होतो. मागील दोन वर्षांपासून हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरत आहे.

लक्ष्मण पुलाटे, प्रगतिशील शेतकरी, लोणी.