तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या शिक्षकांमध्ये समाधान, चिमुकल्याच्या उपचारासाठी शिक्षकांची मदत
शासनाने यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, ऑनलाईन झालेल्या या बदल्यांमुळे काही अपवाद वगळता शिक्षकांनी समाधान व्यक्त केलेे. आज पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेऊन या बदली झालेल्या शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, कोरेगावचे सरपंच बापूसाहेब शेळके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे गटविकास अधिकारी अनिल शिंदे आदींसह शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी बुद्धिवंत यांचे हस्ते बदलीच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्वांनी नवीन शाळेवर मोठ्या उत्साहाने व आत्मीयतेने काम करावे, यापुर्वी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी चांगले काम केले असून, आगामी काळात सर्वजण तशाच पद्धतीने आपले काम पुढे सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
कर्जत तालुक्यातील 271 उपाध्यापक, 31 पदवीधर शिक्षक, 5 मुख्याध्यापक व एक उर्दू पदवीधर अशा 308 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यातील 100 शिक्षक तालुक्याच्या बाहेर गेले आहेत.
या सर्व शिक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. तीन शिक्षकांच्या झालेल्या बदलीच्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे अशा तीन शिक्षकाबद्दल वरीष्ठांचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तर काही शिक्षकांनी आपल्या समस्या मांडत शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारी वा हरकती नोंदवल्या आहेत. त्या वरिष्ठ पातळीवर आपण पाठविणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
तालुक्यातील आठ ते नऊ शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ आली असून, या शिक्षकांना शाळाच मिळाल्या नाही, त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या शिक्षकांना शाळा मिळाल्या असून या शिक्षकांवर अन्याय झाला असल्याच्या प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केल्या. याबाबत शिंदे यांचेकडे विचारणा केली असता, अशा काही शिक्षकांचे अर्ज आपल्याकडे आले आहेत, त्याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपळवाडी येथील रोहन दत्तात्रय जंजिरे या चिमुकल्याच्या वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक शिक्षकांनी स्वखुशीने प्रत्येकी पाचशे याप्रमाणे 287 शिक्षक-शिक्षिकांनी 143970 रुपये जमा केले. याबाबत शिक्षण समितीमध्ये चर्चा झाली होती. तर पंचायत समिती सभागृहानेही मदतीबाबत आवाहन केले होते. त्यानुसार सुट्टीनंतर बदलीच्या निमित्त प्रथमच एकत्र आलेल्या शिक्षकांनी तत्परतेने पुढाकार घेत मदत जमा केली. उर्वरित शिक्षक ही आपली मदत जमा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येत्या चार दिवसात वरिष्ठ कार्यालयाच्या संमतीने हा निधी पदाधिकारी, पत्रकार, संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संबंधित पालकांकडे सुपूर्त केला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.