Breaking News

भाजपचे सुरेश धस विजयी ; धनंजय मुंडेंना धक्का उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुक

उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस हे विजयी झाले असून, राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा त्यांनी पराभव केला. एकूण झालेल्या 1 हजार 4 मतांपैकी सुरेश धस यांना 526 तर अशोक जगदाळे यांना 452 मते मिळाली.धस यांनी जगदाळे यांचा 74 मतांनी पराभव केला आहे. या निकालामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

या ठिकाणी एकूण 1 हजार 5 पैकी 1 हजार 4 एवढे मतदान झाले होते. त्यापैकी आज झालेल्या मतमोजणी नुसार भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांना 526 तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मते मिळाली. एकूण 25 मते बाद ठरली तर एक मत नोटाला मिळाले. त्यामुळे भाजपचे सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांचा 74 मतांच्या फरकाने पराभव केला. राज्यातील विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी 21मे रोजी निवडणूक झाली होती.उस्मानाबाद-लातूर-बीड ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल 24 मे रोजी जाहीर झाले होते. तब्बल 18 दिवसानंतर या ठिकाणची मतमोजणी करण्यात आली.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांना राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी भाजपावर आणि पंकजा मुंडेंवर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा दिल्याने या ठिकाणी भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती.

उमेदवार मत
सुरेश धस 527
अशोक जगदाळे 451
नोटा 1
बाद 25
एकुण मते 1003