तंत्रशिक्षणातून आगामी काळात तरुणांना विविध संधी ः डॉ. आनंद पवार
पारनेर/ प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई आणि श्री समर्थ तंत्रशिक्षण पॉलिटेक्निकल म्हसणे फाटा ता. पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून श्री समर्थ पॉलिटेक्निकल म्हसणे फाटा ता.पारनेर या कॉलेजची निवड करण्यात आली होती.
या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. आनंद पवार, उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 10 वी नंतर पदविका अभ्यासक्रमांची माहिती मिळावी व यापुढे कोणकोणते विकल्प विद्यार्थ्यांपुढे आहेत, त्यांची माहिती अशा मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळते. 10 वीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा असे, त्यांनी विद्यार्थांना संगितले. पालकांनीदेखील आपल्या मुलांना तंत्रशिक्षण द्यावे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन करावे, त्याचप्रमाणे सुपा नवीन औद्योगिक वसाहतीमुळे येणार्या काळामध्ये या परिसरामध्ये मोठ्या नोकर्यांच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना अशा पॉलिटेक्निकलमध्ये प्रवेश देऊन डिप्लोमाचे शिक्षण द्यावे असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी समर्थचे संचालक कैलास गाडीलकर यांचे अभिनंदन केले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना मिळावी म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला.
पीजीचे सहाय्यक व्यवस्थापक रवींद्र करवंदे म्हणाले की, सुपा एमआयडीसी ही येणार्या पाच-सहा वर्षांमध्ये राज्यातील नंबर एकची एमआयडीसी होणार असून, तरुणांना या ठिकाणी अनेक संधी आहेत. पन्नास टक्के कंपन्यांत डिप्लोमा व आयटीआयच्या जागा शिल्लक असतात.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, इतर कोण कुठे अॅडमिशन घेणार आहे ते न पाहता तुमच्यात जे गुण आहेत, त्याप्रमाणे मार्ग निवडा म्हणजे नक्कीच त्यात चांगले प्राविण्य मिळवता येईल.
यावेळी निलेश लंके, तुकाराम नरसाळे, रवींद्र करवंदे, विष्णू भुजबळ, अजय वाबळे, गणेश वाघ, श्री समर्थ अकॅडमीचे संचालक कैलास गाडीलकर, मार्तंड बुचुडे, शशिकांत रासकर, प्राचार्य किशोर जाधव यांचेसह जिल्ह्यातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा भाबंरे यांनी केले, कैलास गाडीलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आभार मानले.