132 क्रमांकाच्या चारीस पाणी सोडण्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन
श्रीगोंदा / प्रतिनिधी ।
कुकडी पाटबंधारे प्रकल्प श्रीगोंदाचे उपअभियंता सुभाष कोळी यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी, 132 क्रमांकाच्या चारीचे पाणी सोडण्यासाठी शेतकर्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी उपस्थित होते. पोलिसांच्या बंदोबस्तात व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत सदरील आंदोलन पार पडले.
सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्यातील कुकडी कालव्यांंतर्गत येणार्या 132 क्रमांकाच्या चारीला आजपर्यंत पाणी आले नाही, पाणी सुटून आज जवळपास 10 ते 12 दिवस उलटले आहेत. मात्र सदरील चारीवरील सर्व शेतकरी पाण्यापासून वंचित असल्याने आज कुकडीच्या श्रीगोंदा येथील कार्यालयासमोर सर्व शेतकर्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या चारीखाली सुमारे 10500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून, पाऊस लांबणीवर पडल्याने येथील शेतकर्यांचे पाण्यावीणा हाल होत आहेत. 132 क्रमांकाच्या चारी अंतर्गत बाबुर्डी, लिंपंणगाव, मढेवडगाव, श्रीगोंदा, पारगाव, चिंभळा, आंनदकरमळा, चोराचीवाडी, वेळू, जकातेवस्ती, शेंडगेवाडी, म्हातार पिंप्रीसह बेलवंडी स्टेशनच्या आसपासचा परिसर व मोठया प्रमाणात फळबागा आहेत. डाळिंब, द्राक्षे, लिंबू, ऊस आदी पिके या पाण्यावर अवलंबून आहेत. सुमारे 29 पाणी वापरसंस्था सदरील चारी वर असून त्यांची 80 टक्के वसुली आहे. तरीही, येथील शेतकरी पाण्यापासून वंचित असल्याने मुख्यत्वे हे आंदोलन चालविण्यात आले असल्याचे समजते.
या आंदोलनात माजी मंत्री बबनराव पाचपुते हे उपस्थित होते, त्यांनी यावेळी कुकडीच्या वरिष्ठ अधिकार्यांना फोन करून पूर्ण हेड टू टेल पाणी देण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या आश्वासनानुसार पाणी न सुटल्यास कार्यलयास टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.
या आंदोलनात सतीश मखरे, सुनील वाळके, गोरख आळेकर, बाप्पू सिदनकर, संतोष खेतमाळीस, बंडू कोथिंबीरे, संतोष शिंदे, अख्तर शेख, बबन आंनदकर, सखाराम गांजुरे, किरण खेतमाळीस, संजय आंनदकरसह हरिभाऊ काळे आदी उपस्थित होते.