Breaking News

जोहरवाडी येथे बस चालकास बेदम मारहाण


पाथर्डी (प्रतिनिधी) 
पाथर्डी येथून सोनोशी येथे मुक्कामी गाडी घेऊन गेलेल्या गाडीचे चालक रोहिदास ज्ञानदेव पालवे यांना तालुक्यातील जोहरवाडी येथे १०ते १५ लोकांच्या जमावाने गाडीच्या किरकोळ कारणावरून लाकडी दांडके, कुऱ्हाडी, गज, चैनच्या साह्याने बेदम मारहाण केली असुन त्यामध्ये त्यांच्या डोक्याला, पायाला, पाठीला, जबर मार लागण्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्याच्या सोबत असलेल्या वाहक आशा बुळे यांना देखील धक्काबुक्की करून त्यांच्या कडील कॅश हिसकावून घेतली सदरील घटनेवरून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत भा.द.वि.कलम ३९५, ३५३, ३३२, ३४१, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर पोलीस कॉन्स्टेबल मोहिते सागर, अरविंद चव्हाण यांनी तात्काळ लक्ष्मण अश्रू आठरे (वय ४५ ), राजेंद्र आठरे (वय ३६) यांना अटक केली असुन पुढील आरोपीचा शोध चालू आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास जोहरवाडी च्या अलिकडे एक टँकर रोडच्या लगतच्या खड्यात फसलेला होता . तो काही लोकांनी बाहेर काढला त्यावेळी बस पुन्हा चालू करून पुढे जात असताना अचानक तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी बसच्या पुढे येऊन बस थाबण्यास सांगितली असता बस चालक पालवे यांनी बस थंबवली . त्यावेळी त्यांना अनोळखी इसमानी काही कारण नसताना शिवीगाळ केली. त्यावेळी समजूतदारपणे त्यांना काही न बोलता पालवे यांनी बस तशीच पुढे नेऊन सोनोशी मुक्कामी येऊन थांबले. त्यानंतर रविवारी सकाळी पाथर्डी येथे येत असताना राजेंद्र आठरे, लक्ष्मण आठरे व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी १० ते १५ जणांनी जोहरवाडी येथे पिक अप गाडी ( एम. एच. १६ सी. सी. ०४२१) ही बसला आडवी लावून रोहिदास पालवे यांना बसच्या बाहेर ओढून मारहाण केली. सदर प्रकार चालू असताना वाहक आशा बुळे या बसमध्ये घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या असताना वरील मारेकऱ्यातील ५ ते ६ जणांनी बसच्या आतमध्ये चढुन प्रवाशांना व वाहक आशा बुळे यांना दमदाटी करत त्यांच्या खिशातील तिकिट विक्री करून ६,८४६ ही सरकारी रक्कम धक्काबुक्की करून हिसकावून घेतली त्यानंतर बस कर्मचारी यांनी सदरील प्रकाराबद्दल बसच्या अधिकारांना माहिती दिली असता पाथर्डी पोलीस व बस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत रोहिदास पालवे यांना पुढील उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल केले . परंतु त्यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले . वाहक आशा बुळे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.