जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी दादासाहेब साबळे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा: जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघांची शिखर संस्था असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी तालुक्यातील कोरेगाव येथील युवक कार्यकर्ते दादासाहेब साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने नविन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. संघाच्या मुख्य कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी हरीष कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळ बैठकीत ही निवड करण्यात आली.अध्यक्षपदी काकासाहेब नरवडे (शेवगांव) यांची निवड करण्यात आल्यानंतर, उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब साबळे यांच्या नावाची सुचना विलास थोरात यांनी मांडली. या सुचनेला मिनाक्षी गोंदकर यांनी अनुमोदन दिले. निर्धारीत वेळेत उपाध्यक्षपदासाठी साबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले साबळे हे कोरेगाव येथील युवक कार्यकर्ते आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या साबळे यांची संघावर बिनविरोध निवड झाली होती. आता संघाच्या उपाध्यक्षपदीही त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. निवडीनंतर त्यांची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
निवडीनंतर साबळे यांचा नागवडे’ कारखान्याच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष केशवराव मगर, संचालक अॅड. अशोक रोडे यांचेसह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. निवडीबद्दल साबळे यांचे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आ. राहूल जगताप, ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत ओगले, सभापती अनुराधा नागवडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णा शेलार, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, माजी संचालक प्रेमाकाका भोयटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोहारे, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर यांनी अभिनंदन केले आहे.
