पीएमसी एम्प्लॉईज युनियन व पालिका कर्मचारी यांच्या वतीने ‘सचिन’ नावाचा लघुपट तयार
पुणे - पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांनी यापूर्वी काढलेल्या फ्लायओव्हर या लघुपटास मिळालेले यश डोळ्यासमोर ठेवून पीएमसी एम्प्लॉईज युनियन आणि पालिका कर्मचारी यांच्या वतीने ‘सचिन’ नावाचा आणखी एक 30 मिनिटांचा लघुपट तयार करण्यात येणार आहे. या लघुपटासाठी येणा-या खर्चापैकी 50 टक्के म्हणजे 2 लाख 99 हजार रुपये खर्च महापालिका करणार असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांनी रेल्वे पूलाचा वापर करावा आणि अपघात टाळावेत, असा सामाजिक संदेश देणारा 22 मिनिटांचा ‘फ्लायओव्हर’ नावाचा लघुपट सन 2010 मध्ये पालिकेच्या कर्मचा-यांनी तयार केला होता. हा लघुपट शाळा, कार्यालये व वस्ती विभागांमध्ये दाखविण्यात आला. या लघुपटाला पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, गुजरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल, नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल व नॅशनल अकॅडमी ऑफ सिनेमा अॅण्ड टेलिव्हिजन, बेंगळुरू या फेस्टिव्हलमध्ये मानांकन मिळाले होते.
