Breaking News

मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम करण्यासाठी 3 कोटी 96 लाख


पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये मैलापाणी वहन व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम करण्यासाठी 3 कोटी 96 लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महापालिका हद्दीत लोहगाव मुंढवा, हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. या समाविष्ट गावांमध्ये पाण्याबरोबर मैलापाण्याची वहन व्यवस्था करणे आवश्यक आहे. या गावाच्या विकास कामाच्या आढावाच्या बैठकीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मैलापाणी वहन व्यवस्थेचे काम येत्या दिवाळीपर्यंत सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 11 गावामध्ये मैलापाण्याच्या कामासाठी वहन व्यवस्थेचा मास्टर पॅलन तयार करणे आवश्यक आहे. हे काम करताना पालिकेच्या जुन्या हद्दीतील मलवाहिन्यांचे जाळयाशी त्यांची सुसुत्रता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे 11 गावामध्ये मैलापाणी वहन व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या सल्लागारांना 3 कोटी 96 लाख देण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी ठेवला होता. त्याला स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे, असे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी सांगितले.