Breaking News

मुक्त विद्यापीठाचा कॅम्पस होणार डीजीटल

नाशिक,- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा परिसर आता लवकरच फ्री वाय फाय झोन होणार असून तो जिओ डीजीटल कॅम्पस म्हणून अस्तित्वात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. 

यामुळे संपूर्ण परिसर हा वाय फाय प्रणालीने युक्त करण्यात येणार असून परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्‍यांसाठी मोफत व वेगवान 4 - जी इंटरनेट वाय - फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकताच विद्यापीठ प्रशासन व रिलायन्स जिओ कंपनी यांच्यात करार झाला आहे. त्यामुळे आधुनिक व प्रगत शिक्षण देताना विद्यापीठाने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे.
विद्यार्थ्यांना स्वयम हे शैक्षणिक पोर्टल विनासायास वापरता यावे यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे देशातील सर्व विद्यापीठांचा कॅम्पस डीजीटल करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ‘स्वयम’ पोर्टल हा महत्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्प आहे. त्यानुसार संबंधित शिक्षक - प्राध्यापक व विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची अद्यावत माहिती, नोटस, संबंधित चित्रफिती, चर्चा - परिसंवाद याद्वारे ऑनलाईन मिळावी असा प्रयत्न आहे. 
त्यासाठी देशभरातील सर्व विद्यापीठांनी आपल्या आवारात मोफत व वेगवान इंटरनेट वाय - फाय सुविधा पुरवावी, विद्यापीठ आवार ‘डीजीटल’ करावा असे निर्देश संबंधित मंत्रालयाने जारी केले होते. त्यानुसार मुक्त विद्यापीठाने कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या नेतृत्वाखाली अधिक ‘स्मार्ट’ बनण्याचा संकल्प सोडला आहे. वंचितांना शिक्षण ही आपली भूमिका कायम ठेवून, बदलत्या क ाळाची पावले ओळखून मुक्त विद्यापीठाने आता अधिक ‘डीजीटल’ होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. 
कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व रिलायन्स जिओ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक महेश देवगडे यांच्यात याबाबत सामंजस्य करार पार पडला. ही सु विधा ही लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.