‘स्वच्छ’ राहुरीत घाणीचे साम्राज्य
राहुरी तालुका प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी ‘स्वच्छ राहुरी’, ‘सुंदर राहुरी’ असे म्हणत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात राहुरी नगर परिषदेने राज्यात प्रथम पारितोषिक मिळविले. मात्र या नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील दोन नगरसेवकांमुळे या प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये विकास आघाडीच्या राधा साळवे व परिवर्तन आघाडीचे विक्रम भूजाडी या दोघांवर मतदारांनी विश्वास ठेऊन त्यांना नगरसेवकपदासाठी निवडून दिले. या दोन्ही नगरसेवकांनी निवडणूक काळात मतदारांना विविध प्रकारची आश्वासने देऊन मते पदरात पाडून घेतली. मात्र निवडून आल्यानंतर या दोघांनीही मतदारांकडे पाठ फिरविली, असा मतदारांमधून केला जात आहे. या प्रभागातील खाटिकगल्लीतील मटन मार्केटजवळ मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात पुरुषांसाठी शौचालय नाही. फक्त महिलांसाठी पाच ते सहा शौचालय आहेत. त्यापैकी एकाही शौचालयाला दरवाजा नाही. काही शौचालये मोडकळीस आली आहेत. पुरुषांना शौचालय नसल्याने चक्क महिलांच्या शौचालयात पुरुष जात आहेत.
या दोन्हीही नगरसेवकांना नागरिकांनी याबाबत सांगितले. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही. राधा साळवे या प्रभागातील नगरसेविका असून त्या फक्त नावापुरत्याच आहेत. नगरपरिषदेमधील सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात. याप्रकरणी नगराध्यक्षांनी लक्ष घालून या प्रभागातील नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, या प्रभागातील नागरिकांची समस्या विरोधी गटातील नगरसेवक शहाजी ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते अफनान आतार, गणेश खैरे, बिलाल शेख, आतिक बागवान, राजू शेख, जिशान शेख आदिंनी या प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
