Breaking News

अग्रलेख एसटीची दरवाढ सर्वसामान्यांच्या मुळावर !


सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून जिचा उल्लेख केला जातो, त्या लालपरीच्या तिकिटाचे दर 18 टक्क्यांनी वाढवल्यामुळे सर्वसामान्यांना एसटीने प्रवास करणे जिकिरेचे झाले आहे. मुळातच एसटीने प्रवास करणारा वर्ग हा ग्रामीण व निमशहरी भागातील आहे. या वर्गाकडे प्रवासाची कोणतीही साधने नसल्यामुळे हा वर्ग एसटीने नेहमीच  प्रवास करतो. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे कारण देत राज्यसरकारकडून दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्य परिवहन प्राधिकरणाने देखील हा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे ही दरवाढ सुरू झाली आहे. दरवाढ ही 2 ते 5 टक्के ठीक होती, मात्र 18 टक्के दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना आता एसटीने प्रवास करणे देखील मुश्किलीचे झाले आहे. दरवाढ करून एसटीचा तोटा भरून निघणार नाही. त्यासाठी एसटीत आमुलाग्र बदल करावे लागणार आहेत, मात्र त्यासाठी एसटी प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेणे अपेक्षित आहे. चांगली व प्रामाणिक सेवेबरोबर नाविण्यपूर्ण संकल्पना, आणि उपक्रमाद्ारे हा तोटा सहज भरून निघू शकतो, मात्र त्यासाठी हवी इच्छाशक्ती. मुळातच एसटीने चांगली सेवा दिल्यास खाजगी वाहनांकडे वळणारा प्रवाशांचा ओढा कमी होईल, आणि एसटीला सुगीचे दिवस येतील. मात्र एसटी ही सरक ारी असल्यामुळे मनमानीसारखा कारभार सुरू आहे. काही चालक आणि वाहक यांची अरेरावी, आणि प्रवाशांसोबत असलेला सहानुभूतीचा अभाव, खाजगी वाहतूकीला प्रोत्साहन देणारा ठरत आहे. यासोबतच चालक आणि वाहकांचे असणारे पगार हा देखील चिंतेचा विषय आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू असतांना चालक आणि वाहकांना मिळणारा तुटंपुंजा पगार चिंतेचा विषय आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनांकडून दिवाळी आणि आता झालेला संप हा त्याचेच निदर्शक आहे. त्यामुळे एसटीच्या महसुलाचा तुटवडा भरूण काढण्यासाठी केवळ दरवाढ हा उपाय नाही. कारण एसटीच्या दरवाढीमुळे खाजगी वाहतुकदार कमी पैश्यांत नेत असतील, तर अनेकजण खाजगी वाहतूकीला प्रथम पसंदी देतील. त्यातुन पुन्हा अवैध वाहतुक, आणि जास्तींच्या संख्येने प्रवाशी कोंबण्याचे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी एसटीने दरवाढ ऐवजी चांगली सेवा, आणि आपला प्रामाणिकपणा जपल्यास एसटीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एसटीला परिवहनमंत्री देखील चांगला असण्याची गरज आहे. एसटीमध्ये सुधार करण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण योजना आणाव्या लागणार आहे. एसटीचे असणारे थांबे, होणारा वेळ यामुळे अनेक प्रवांशी खाजगी वाहनांना पसंती देतात. त्यामुळे वेळेवर जर प्रवास झाला, चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या तर सर्वसामान्यांच्या व्यतिरिक्त आरामदायी प्रवास करणारा वर्ग देखील यामध्ये जोडला जाऊ शकतो. राज्य परिवहन प्राधिकरणात असलेले प्रशासकीय अधिकार्‍यांकडून या आमुलाग्र बदलांची अपेक्षा आहे. त्यासाठी एसटीचा अभ्यास असणार्‍या व्यक्तींची नियुक्ती जर केली, तर तो संपूर्ण महामंडळाला ताळयावर आणू शकतो. कारण एसटीच्या वेळा, प्रवाशांची कुठे गर्दी, तर कुठे रिकाम्या बसेस, विद्यार्थ्यांचे लोंढे, एसटीअभावी त्यांची होणारी तारांबळ या संपूर्ण बाबी एसटीच्या पीछेहाटीला कारणीभूत आहे. मुळातच एसटीबसची 80 ते 90 च्या काळात एक वेगळीच इमेज होती. खाजगी गाडयांचे पेव कमी होते, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती एसटी प्रवासाला प्राधान्य द्यायचा. मात्र ह्ल्लीच्या काळात वाढती स्पर्धा, खाजगी ट्रॅव्हल्स, अवैध वाहतूक याचा परिणाम एसटीवर झाला. त्यात एसटी आपली गुणवत्ता देखील गमावून बसली, परिणामी एसटी तोटयात गेली. हा तोटा कसा भरून काढायचा हा यक्षप्रश्‍न एसटी प्रशासनासमोर असला तरी, हा तोटा भरून काढण्यासाठी अभ्यासपूर्ण व नावीण्यपूर्ण संकल्पना राबविणे गरजेचे आहे.