झरेकाठीच्या बहुरूपी शिंदेला ग्रामस्थांचा चोप
।संगमनेर/प्रतिनिधी।
सोशल मिडियावर वाचायला, बघायला मिळालेल्या माहितीवर अतिरिक्त विश्वास ठेऊन आजकाल लोक कशा पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवतात आणि त्याला बळी पडतात , याचे उत्तम उदाहरण काल [ दि. १७ ] दुपारी समनापूर गावात बघायला मिळाले. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे राहणारा आबा पांडुरंग शिंदे याला स्त्रीवेषात मुले पळविणाऱ्या टोळीचा सदस्य समजून समनापूर ग्रामस्थांनी काहीही विचारपूस न करता त्याला बेदम मारहाण केली.
आबा शिंदे हा ३३ वर्षाचा युवक कलागुणांचा वापर करून स्त्रीवेष परिधान करत असतो. तालुक्यातील आठवडे बाजारात भिक्षा मागण्याचे काम करत अर्थात पोटाची खळगी भरावी, यासाठी तो हे करतो. परंतु त्याला चोप देणाऱ्या ग्रामस्थांपैकी एकालाही त्याची साधी चौकशी करावीशी वाटली नाही. सोशल मिडियावर आलेल्या मुले पळविण्याच्या ‘पोस्ट’ पाहून हे खरे समजून समाज किती अतिसंवेदनशील होऊन निर्दयीपणे वागू शकतो, याचे हे बोलके उदाहरण आहे.
सध्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर दुसऱ्या राज्यातून आलेली ३ हजार लोकांची पोरं पळविणारी टोळी महाराष्ट्रात आली असून, त्यापासून सावध राहण्याची सूचना देणारा संदेश राज्यभरातल्या अँड्रॉइड मोबाईल, व्हॉटस्अप, फेसबुक अशा माध्यमांवर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे यातील एकाही वृत्ताला वर्तमानपत्रांनी दुजोरा दिलेला नसताना लोक या अफवांना बळी पडू लागली आहेत. त्यात शिर्डीत पकडलेल्या चोरट्यांना झालेली मारहाण, त्यांची छायाचित्रे सोशल माध्यमांवर पोस्ट करून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती बघायला मिळत आहे. प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे संशयित नजरेने बघण्याचा जणू कार्यक्रमच सुरु झाला. पोलीस प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेऊन अशा पद्धतीने पसरणाऱ्या अफवांवर निर्बंध घालण्यासाठीच्या उपाययोजना करायला हव्या, अशी अपेक्षा व्यक्त आहे.
