Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकमधील दोन तर्‍हा जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या बदली राजकारणासमोर सीईओंची शरणागती

नाशिक/ कुमार कडलग - पट्यापट्याचे कातडे पांघरूण शिकार्‍याचा आव आणला तरी तो फार काळ टिकत नाही असा काहीसा प्रकार नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात दिसत आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा परिषदेला मुखिया म्हणून लाभलेले मुख्यकार्यकारी अधिकारी कर्तव्यकठोर आहेत अशी हवा निर्माण झाली होती, तथापी पुर्वाश्रमीचे दिपककुमार मिना आणि विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते नामधारी प्रशासकीय वाघोबा असल्याचे वेळोवेळी सिध्द झाल्याची चर्चा जिल्हापरिषद वर्तुळात आहे. जिल्हा आरोग्य अ धिकार्‍यांच्या बदली प्रकरणात झालेल्या राजकारणातून ही बाब अधोरेखीत झाली आहे.

जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय यंत्रणेचा मुखिया असलेले मुख्यकार्यकारी अधिकारी हे पद राजपत्रित आहे. या पदाचे अधिकार लक्षात घेता प्रशासनात राजकीय लुडबूड शक्यतो खपवून घेतली जात नाही. दिपकुमार मिना, नरेश गिते अशा राजपत्रित अधिकार्‍यांना तर अशी लुडबुड सहन होत नाही असा आभास या दोघांनी पदभार स्वीकारतांना निर्माण केला होता. नव्हे जिप जनमानसात तो समज सुरूवातीच्या शिस्तप्रियतेने दृढही झाला होता. मात्र या दोन्ही वेळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल वाक चौरे या एका विवादीत अधिकार्‍यांच्या बदलीकांडातील राजकारणाने त्या अविर्भावातील हवा काढून घेतली.
सहा महिन्यापुर्वी डॉ. राहुल वाकचौरे यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांची बदली धुळे जिल्हा परिषदेतील रिक्त जागेवर होऊन त्यांच्या जागेवर मनपात प्रतिनियूक्तीवर गेलेले डॉ. डेक ाटे यांना रूजू करण्याचे आदेश झाले होते.
तथापी त्या बदली आदेशाची अंमलबजावणी करण्यात तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मिना यांनी वेळकाढू धोरण स्वीकारल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून डॉ. राहुल वाकचौरे यांचे धुळ्याला जाण्यास धाडस होत नसल्याने मॅटमध्ये धाव घेऊन तत्कालीन बदली आदेशाला स्थगीती मिळवली. दरम्यानच्या काळात डॉ. वाकचौरे यांच्यासोबतच्या तीन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनीही मॅटमध्ये धाव घेतली होती. त्या तीन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या बदलीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झाल्यानंतर तुर्त बदली स्थगित करून नियमीत बदली प्रक्रीयेत या बदल्या करून पुर्वीच्या आदेशानुसार नियुक्ती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रक्रीयेत डॉ. वाकचौरे यांची फाईल मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचली नाही. विद्यमान बदली प्रक्रीयेत चार वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्याने डॉ. राहुल वाकचौरे यांची पुन्हा भंडारा येथे बदली झाली आणि त्यांच्या जागेवर पुर्वी आदेश झालेले डॉ. डेकाटे यांना रूजू करण्याचे आदेश झाले. मात्र या आदेशाला विद्यमान मुख्य कार्यकार्यकारी नरेश गिते यांनी पालकमंत्र्यांच्या दरबारात भिजत ठेवले. पालकमंत्र्यांची इच्छा नसल्याने हजर करून घेऊ शकत नाही असा निरोप मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी धाडला. शासनाने आदेश दिला असताना कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या हुजूर परवानगीची गरज भासते यावर जिल्हा परिषद वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
या घडामोडीनंतर आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयातून डा.डेकाटे यांना हजर करून घेण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना भ्रमणध्वनी आदेश झाल्यानंतर पालकमंत्र्यांचे बुजगावणे क ाढून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची परवानगी घ्या असा पवित्रा मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी घेतल्याने या बदलीच्या राजकारणासमोर राजपत्रित अधिकारी आवेगभग्न झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान उशिरा मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी डॉ. डेकाटे यांना हजर करून घेण्याचे आदेश उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना दिले असून उद्या सकाळी (मंगळवारी) चार्ज देण्याचा सोपस्कार पार पडणार आहे. एका वादग्रगस्त जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी आपली कर्तव्यदक्षता पणाला का लावत होते हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीत आहे.
उद्याच्या अंकातः
वादग्रस्त कोण? डॉ. डेकाटे की डॉ. वाकचौरे...
जिल्हा परिषदेतील आरोग्य व्यवस्थेसह बोरूबहाद्दरांच्या अविवेकीपणाचा पंचनामा...