Breaking News

प्लास्टिक पिशव्याचा वापर बंद करा ; अन्यथा कारवाई


नेवासा शहर प्रतिनिधी

प्लास्टिक पिशव्या, चमचे , कप, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकाॅल ताट, वाट्या, अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापणारे प्लास्टिक आदींवर बंदी आहे. त्याचप्रमाणे औषधाचे वैष्टन, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्याचे प्लास्टिक, अन्नधान्यसाठी ५० मायक्रॉनच्या पिशव्या, कच्चा माल साठविण्यात वापरात येणारे बिस्किटे, वेफर्स आदी ५० मायक्रॉनवरील प्लास्टिकवर बंदी नाही. मात्र या व्यतिरिक्त उर्वरित प्लास्टिकचा वापर टाळावा. अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी समीर शेख यांनी दिला. 

प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने शहरातील व्यावसायिकांची एक बैठक मुख्याधिकारी शेख यांनी बोलाविली होती. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील होते. या बैठकीत शेख बोलत होते. यावेळी राजेंद्र मुथ्था, रामभाऊ जगताप, संतोष ओस्तवाल, विजय गांधी, लक्ष्मण रासने, बंडू सचदेव, प्रकाश गुजराथी, शेख बागडीवाले, आरिफ पठाण आदी व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी कायद्याबाबत प्रश्न मांडले. त्यामध्ये सध्या ज्या व्यावसायिकांकडे प्लास्टिकचा माल आहे, मिठाई पॅकिंग, कपड्याचे पॅकिंग, किराणा माल पॅकिंग तसेच विविध उत्पादनाचे पॅकिंग आहे, त्याचे काय करायचे, अशी शंका व्यापाऱ्यांनी उपस्थित केली. व्यावसायिकांच्या या शंकांचे निरसन शेख यांनी सविस्तरपणे उत्तरे देऊन केले. दरम्यान, कापडी पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांचा मुख्याधिकारी शेख, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील आणि राजेंद्र मापारी यांनी सन्मान केला.