Breaking News

पहिल्याच पावसात मंत्रालयाला गळती जानकरांच्या दालनाबाहेर पाणीच पाणी

मुंबई - राज्यात सर्वत्र आजपासून मान्सून सक्रिय असून पहिल्याच पावसात मंत्रालयाला गळती लागली आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या दालनाबाहेर इमारतीच्या छतावरून पावसाचे पाणी पडत आहे. जानकरांच्या कार्यालयाबाहेर सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कंत्राटी कामगारांना ते पाणी उपसण्याचे काम देण्यात आले आहे. एकूण पाच ते सहा जण त्या परिसरात कार्यरत आहेत. राज्याच्या मंत्र्यांच्या दालनाबाहेर हे चित्र असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाच्या जोराबरोबरच छतावरून पडणार्‍या पाण्याची धारही वाढत असून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मंत्री जानकर त्यांच्या दालनात उपस्थित नाहीत. त्यांचा क र्मचारी वर्ग कार्यलयात उपस्थित आहे, मात्र याबाबत बोलण्यास त्यांनी तयारी दर्शवली नाही. संबंधित विभागाला कळवण्यात आले असून लवकरच याची दुरूस्ती केली जाईल असे क र्मचार्‍यांनी सांगितले.