Breaking News

कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा आपत्कालीन विभाग सज्ज, कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द

मुंबई - राज्यासह मुंबईत पावसाने जोर धरला असून कोकण किनारपट्टीवर पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला असून या विभागातील कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे संचालक दौलत देसाई यांनी दिली आहे.

अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या 9 ते 11 जूनदरम्यान राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयेही आपत्कालीन विभागाच्या संपर्कात राहणार आहेत. या दिवसात 24 तास स्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दुर्दैवाने आपत्ती उद्भवल्यास राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. मासेमारीला आधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने किनारपट्टी भागातही विशेष पथके या दरम्यान तैनात करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबई आणि परिसरातल्या भागात असलेल्या महापालिकांनाही सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे. पालिकेकडे असलेल्या बचाव साधनांची तपासणी करून घेण्यात आली असून गरज लागल्यास ही साधने ग्रामीण भागात पाठवण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.