कुळधरण- कोपर्डी मार्गावर विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतुक
कुळधरण / प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कुळधरण-कोपर्डी मार्गावर विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला. कोरी नंबर प्लेट असलेल्या वाहनातून ही वाहतूक अत्यंत धोकादायक पध्दतीने होत असुन, अशा वाहनांना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध वाहतूक फोफावली असुन, जीवघेणी प्रवासी वाहतूक सुरु आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी बस आली नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मिळेल त्या वाहनांस लटकून प्रवास केला.
शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रकार समोर आला. कोपर्डी येथील घटनेनंतर या मार्गावरुन येणार्या विद्यार्थ्यांच्या प्रवासी वाहतुकीची चांगलीच चर्चा झाली.विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात आली. या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरु करण्यात आली. त्यासाठी शाळा प्रशासनाला बराच पाठपुरावा करावा लागला. मात्र श्रीगोंदा आगारातील व्यवस्थापनाचा फटका अधूनमधून विद्यार्थ्यांना बसत राहिला. अनेकदा बससेवा बंद करण्यात आली. ग्रामस्थांच्या रेट्याने पुन्हा बस सुरु झाली. या मार्गावर नियमित बस देण्याची मागणी मंजूर झालेली असताना पुन्हा यात विस्कळीतपणा येताना दिसत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी बस आली नसल्याने विद्यार्थ्यांना जमेल तसा प्रवास करुन घरी पोहोचावे लागले. दप्तराचे ओझे घेवुन अनेक अनेक विद्यार्थी मालवाहतूक करणार्या वाहनाला लटकलेले दिसून आले. तर अनेक विद्यार्थ्यांनी पायी जाणे पसंत केले. तर काही विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने कोपर्डीत पोहोचले. बस न आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. बस नियमित सुरु न झाल्यास पुन्हा रस्त्यावर येणार असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.
कोपर्डीमार्गाच्या दुतर्फा जंगले
कोपर्डीमार्गाच्या दोन्ही बाजूने जंगल असल्याने, येथून एकट्याने प्रवास करणे धोकादायक आहे. वाड्यावस्तीवरील मुलींना अजुनही सायकलवरच जावे लागते. बसमधुन जाणार्या मुलींची संख्या मोठी आहे. मात्र बससेवा विस्कळीत झाल्यास मुलींना भयभीत होवुन जंगलाचे अंतर कापावे लागते.त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शाळेचे आगार व्यवस्थापकांना पत्र
कोपर्डी येथून कुळधरणला विद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.त्यांची सोय होण्यासाठी गेल्यावर्षीपासुन बस सुरु करण्यात आली होती.शाळा नव्याने सुरु होत असल्याने नियमित असलेली बस पुन्हा सुरु करावी, असे पत्र श्रीगोंदा आगारप्रमुखांना देण्यात आले आहे. मात्र पहिल्याच दिवशी बस आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.आगार प्रमुखांनी याची दखल घेवुन बस नियमित सुरु करावी.
- सुर्यभान सुद्रिक,
प्राचार्य, नूतन मराठी विद्यालय,
कुळधरण
